यशस्वी होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फडणवीसांकडून ट्रेनिंग घ्यावं, भाजपचा सल्ला

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात अयशस्वी मुख्यमंत्री आहेत. यांनी यशस्वी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावं, अस म्हणत बिहार भाजपाचे प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. तसंच शिवसेनेनं आपलं नाव बदलून 'बाबर सेना' करावं असा खोचक सल्ला देखील त्यांनी दिला आहे.  शिवसेना-कंगना वादात भाजपने कंगनाला उघडपणे पाठिंबा देत तिला वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली असून भाजप नेत्यांकडूनही सातत्याने उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात येत आहे. (bihar bjp spokesperson nikhil anand criticised maharashtra cm uddhav thackeray over tussle with kangana ranaut)

त्यातच बिहार भाजपाचे प्रवक्ते डॉ. निखिल आनंद यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतके खालच्या पातळीवर जाणारे राजकीय व्यक्ती असतील हे देशाच्या जनतेला माहीत नव्हतं. गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत जी काही वाचाळ बडबड करत आहेत, मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका कंगनाविरोधात जी काही पक्षपाती कारवाई करत आहेत, ती उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरूनच होत आहे, असा आरोप निखिल आनंद यांनी केला आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख... ११ कोटी मराठी जनतेनं ऐकलंय- संजय राऊत

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबाचा वारसा आणि विचारधाराही पणाला लावली. मुख्यमंत्री झाल्यानंतर सुशांत सिंह राजपूत याला न्याय मिळवून देण्याऐवजी सीबीआय चौकशीचा विरोध करत राहिले. इतकंच नाही तर बॉलिवूडच्या 'बाबा - बेबी - मुव्ही माफिया - ड्रग माफिया आणि अंडरवर्ल्ड टोळक्यातील आरोपींच्या बाजूने ते उभे राहिले. 

आपली राजकीय निराशा लपवण्यासाठी कंगणा रणौतसारख्या लोकप्रिय महिला कलाकाराशी दोन हात करण्यासाठी आपलं संपूर्ण सरकार, पोलीस - प्रशासन व्यवस्था आणि आपला पक्ष दावणीला बांधला आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात अयशस्वी मुख्यमंत्री आहेत. यांनी यशस्वी होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावं, असा सल्लाही निखिल आनंद यांनी दिला आहे.

हेही वाचा - कंगना रणौतवर पाेलिसांत आणखी एक तक्रार दाखल

पुढील बातमी
इतर बातम्या