अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने कारवाई केल्यानंतर कंगनाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आपला संपात व्यक्त केला. यावरून सध्या सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यासंबंधी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना विचारलं असता, त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत यावर प्रतिक्रिया दिली. (shiv sena mp sanjay raut denies to talk on actress kangana raut)
कंगनाने मुंबईत पाऊल ठेवल्या ठेवल्याच व्हिडिओ जारी करत मुख्यमंत्र्यांवर आगपाखड केली. उद्धव ठाकरे तुला काय वाटतं की तू फिल्म माफियाशी हातमिळवणी करून माझं घर तोडत बदला घेतला? आज माझं घर तोडलं, उद्या तुझा अहंकार मोडेल. हे वेळेचं चक्र आहे, लक्षात ठेव. अशा एकेरी शब्दांत तिने आपला संताप व्यक्त केला.
हेही वाचा - कंगनाच्या ४८ कोटीच्या मालमत्तेवर पालिकेचा हातोडा, पाहा आलिशान ऑफिसचे फोटो
कंगना रणौतच्या कार्यालावर महापालिकेने केलेल्या कारवाईबद्दल प्रसारमाध्यमांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेत असली, तरी शिवसेनेचा आणि कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईचा काहीही संबंध नाही. यासंदर्भात तुम्ही महापौर किंवा आयुक्तांशी बोलू शकता, असं ते म्हणाले.
त्याशिवाय कंगनाने मुख्यमंत्र्यांचा एकेरी शब्दांत उल्लेख केला, त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असं विचारल्यावर संजय राऊत यांनी केवळ ११ कोटी मराठी जनतेने ऐकलं आहे, अशी मोजकी प्रतिक्रिया दिली.
कंगनाच्या वादावर विनाकारण बोलून उगाच तिचं महत्त्व वाढवू नका, असे आदेश पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना मातोश्रीवरून देण्यात आल्याची माहिती आहे. कंगनाच्या कार्यालयावर महापालिकेने केलेल्या कारवाईवरही न बोलण्याच्या सूचना शिवसेना नेत्यांना करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच संजय राऊत यांनी देखील या वादावर सविस्तरपणे बोलण्यास नकार दिल्याचं म्हटलं जात आहे.
मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर केलेली कारवाई ही सूडबुद्धीने केल्याचा आरोप विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर केला जात आहे.