अभाविपचं राम कदमांच्या विरोधात आंदोलन

एखादी मुलगी तुम्हाला पसंत पडली तर तिला पळवून आणण्यासाठी मी तुमची मदत करेन, अशी मुक्ताफळं उधळणाऱ्या भाजपाचे आमदार राम कदम सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. राम कदमांवर सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक स्तरावरून टीका होत असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेनं (अभाविप) नेही राम कदम यांच्या फोटोला काळं फासत घाटकोपरमध्ये आंदोलन केलं.

राम कदमांचं 'ते' विधान

दहीहंडीच्या दिवशी राम कदम यांनी मुलींनी विरोध केला तरी तिला पळवून आणून लग्नासाठी तुम्हाला मदत करू असं विधान केलं होतं. या विधानाचा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल झाला नि मग चहुबाजूने त्यांच्याविरोधात टीकेचा झोड उठली होती. त्यानंतर बुधवारी त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत व्हिडिओद्वारे दिलगिरी व्यक्त केली होती.

अखेर मागितली माफी

घाटकोपर इथल्या आपल्या दहीहंडीत मी काय बोललो, त्याचा अर्धवट व्हिडिओ दाखवला गेला, तो पसरवला गेला. पण त्याचं विवेचन न करता महाराष्ट्रातील तमाम मातृशक्ती, भगिनी यांचा सन्मान माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. त्यामुळे कोणताही खुलासा न करता मी अत्यंत नम्रपणे दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. त्याशिवाय गुरुवारी सकाळी ट्विटवर पोस्ट टाकत माफी मागितली होती.

'याचा' फटका भाजपला

मात्र राम कदमांच्या या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद मुंबईसह राज्यभर उमटत असून विविध सामाजिक संस्था राजकीय पक्षांकडून निषेध, मोर्चे सुरू आहेत. त्यामुळे याचा मोठा फटका भाजपलाही बसत असून भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण भाजपनं राम कदम यांच्याकडून खुलासा मागवला आहे. त्यांच्या वक्तव्याची सीडीही मागवून घेतली आहे.

दहीहंडीचा उत्सव सगळीकडे उत्साहात चालू असतानाच राम कदमने आक्षेपार्ह विधान करून स्त्रीला माता मानणाऱ्या भारतीय संस्कृती आणि सण यांचा अपमान केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत लवकरात लवकर कारवाई करावी तसंच राज्य महिला आयोगाने नमती भूमिका न घेता लवकरात लवकर अशा योग्य ती कार्यवाही करावी.

- स्वाती चौधरी, सहमंत्री, अभाविप


हेही वाचा - 

"राम नव्हे रावण" - मनसेची राम कदमांविरोधात पोस्टरबाजी

नेटकऱ्यांनी केली राम कदमांची धुलाई

पुढील बातमी
इतर बातम्या