Advertisement

दहीहंडी समन्वयक समितीचा राम कदमांच्या दहीहंडीवर बहिष्कार

यापुढं कोणतंही गोविंदा पथक राम कदम यांच्या दहीहंडीला जाणार नाहीत, इतर आयोजकांनी त्यांना मदत करायची नाही, असा निर्णय घेतल्याची माहिती दहीहंडी समन्वय समितीचे सचिव सुरेंद्र पांचाळ यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

दहीहंडी समन्वयक समितीचा राम कदमांच्या दहीहंडीवर बहिष्कार
SHARES

महिलांविरोधात आक्षेपार्ह विधान करणं भाजपा आमदार राम कदम यांच्या चांगलचं अंगलट आलं आहे. माफी मागितल्यानंतरही राम कदमांविरोधात कारवाई मागणी होत आहे. असं असताना राम कदम यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. कारण राज्य महिला आयोगाने नोटीस बजावल्याला तास उलटत नाहीत तोच दहीहंडी समन्वयक समितीनंही राम कदमांना दुसरा दणका दिला आहे.


जिवाशी खेळ

कदम यांनी दहीहंडीदरम्यान महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करण्यासोबतच अभिनेत्री प्राची देसाई हिच्या एका डायलाॅगसाठी सहा थर लागलेले असताना गोविंदांना थर उतरवायला लावले होते. जिवाची बाजी लाऊन गोविंदांनी थर लावलेला असताना त्यांना अचानक हंडी फोडण्यास मज्जाव करणं आणि थर उतरवायला लावणं हा प्रकार म्हणजे गोविंदांच्या जिवाशी खेळ करण्यासारखाच आाहे. त्यामुळे कदम यांच्या दहीहंडीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचं दहीहंडी समन्वयक समितीनं सांगितलं.


पथकांना सूचना

यापुढं कोणतंही गोविंदा पथक राम कदम यांच्या दहीहंडीला जाणार नाहीत, इतर आयोजकांनी त्यांना मदत करायची नाही, असा निर्णय घेतल्याची माहिती दहीहंडी समन्वय समितीचे सचिव सुरेंद्र पांचाळ यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.


आक्षेपार्ह प्रकार

दहीहंडी फोडण्यासाठी मुंबईतील गोविंदा पथकं महिनामहिना भर सराव करतात. एकावर एक मानवी थर रचणं हे अत्यंत कठीण काम. यासाठी खरोखर गोविंदांना जिवाची बाजी लावावी लागते. थर लावताना शारीरिक समतोल राखण्याबरोबरच मानसिक समतोलही राखावा लागतो. त्यातच केवळ बक्षिस मिळावं हाच एक उद्देश गोविंदा पथकांचा नसतो तर उत्सव म्हणून ही गोविंदा पथक या सणाचा आनंद घेतात असं म्हणत दहीहंडी समन्वयक समितीनं दहीहंडीच्या दिवशी घाटकोपरमध्ये जे काही झाले ते आक्षेपार्ह होतं आणि त्याचा आम्ही निषेध करत असं स्पष्ट केलं आहे.


नेमकं काय झालं होतं?

घाटकोपरमध्ये एका पथकाकडून थर लावले जात होते. सहा थर लागत असतानाच गोविंदांना थांबवत अभिनेत्री प्राची देसाई हिला एका सिनेमातील एक डायलाॅग बोलण्याची विनंती राम कदम यांनी केली. प्राची देसाईनं डायलाॅग बोलायला सुरूवात केली अन् गोविंदा कसेबसे खाली उतरले. हे कमी म्हणून की काय त्यांची भाषाही आक्षेपार्ह होती.

थर रचताना अचानक थांबावल्यावर काही अपघात झाला असता तर त्याला कोण जबाबदार होतं असा सवालही पांचाळ यांनी केला आहे. राम कदमांच्या दहीहंडीवर बहिष्कार घालण्यात आल्यानं पुढच्या वर्षी राम कदम यांची दहीहंडी होते की नाही हे पुढच्या वर्षीच समजेल.



हेही वाचा-

महिला आयोगाच्या दणक्यानंतर राम कदमांचा माफीनामा

दहीहंडीदरम्यान नियमांचं उल्लंघन, राज्य सरकारविरोधात अवमान याचिका



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा