भाजपाने शिवसेनेला दिला 'हा' प्रस्ताव

महायुतीची सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाने शिवसेनेला पहिला प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानुसार, शिवसेनेला १३ मंत्रीपद आणि भाजपला २६ मंत्रीपद अशी ऑफर देण्यात आली आहे.  शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी भाजपाने दर्शवली आहे. मात्र, महत्वाची खाती भाजप आपल्याजवळ ठेवणार आहे.  मुख्यमंत्रीपद, महसूल, वित्त, कृषी, गृह आणि विधानसभा अध्यक्षपद सोडून शिवसेनेशी बोलणी करता येईल, असं या प्रस्तावात म्हटलं आहे. 

भाजपा आणि शिवसेनेत दोन दिवसांपासून सत्ता संघर्ष चालू आहे. त्यामुळे पुढील बोलणी ठप्प होऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला खीळ बसली आहे. या पार्श्वभूमीवर वाटाघाटी सुरू व्हाव्या यासाठी भाजपाने शिवसेनेला सत्ता स्थापनेचा हा प्रस्ताव दिला. आहे. यावर आता शिवसेना काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रस्तावात कॅबिनेट मंत्रीपदे किती आणि राज्यमंत्रीपदे किती याचा तपशील मात्र देण्यात आलेला नाही. 

मागील सरकारमध्ये शिवसेनेला १२ मंत्रीपदं देण्यात आली होती. आता त्यात अवघ्या एका मंत्रीपदाची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव शिवसेना मान्य करेल अशी शक्यता फार कमी आहे. मागील सरकारमध्ये अखेरच्या मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केले होते. मात्र, खूप कमी काळासाठी उपमुख्यमंत्रीपद घेण्यास शिवसेनेने नकार दिला होता. शिवसेनेला दिलेल्या १३ मंत्रीपदाच्या प्रस्तावात कॅबिनेट खाती किती आणि कोणती महत्वाची खाती मिळणार यावर पुढील गणितं ठरतील. 


हेही वाचा -

भाजप हायकमांड करणार उद्धव ठाकरेंशी चर्चा- गिरीश महाजन

भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस


पुढील बातमी
इतर बातम्या