ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातच अनेक ‘शक्ती कपूर’ - अतुल भातखळकर

मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली आहे.

शक्ती कायदा लांबणीवर पडत असल्यामुळे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. “शक्ती कायदा लांबणीवर पडतोय कारण ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातच अनेक ‘शक्ती कपूर’ आहेत. बलात्कारी मंत्री, त्यावर पांघरूण घालणारे सत्तापिपासू मुख्यमंत्री असल्यावर राज्यात महिलांना न्याय मिळेल कसा?”,असा प्रश्न अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवत दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले होते. यावर उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राला पत्रानं उत्तर दिलं आहे.

“देशभरातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावं, अशी मागणी मा. राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांकडे करावी”, असं या पत्रात मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, जलदगती न्यायालयांच्या माध्यमातून अशा प्रकरणांचा निकाल लवकरात लवकर लागावा, तसंच त्यामध्ये शिक्षा होईल, याबाबतही प्रय़त्न करावेत. शक्ती कायद्याचे प्रारूप विधानसभेत मांडण्यात आले आहेत. कायदा परिपूर्ण होण्यासाठी विधीमंडळाची संयुक्त समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात येत आहेत. या समितीचा अहवाल आगामी हिवाळी अधिवेशनात सादर करणार.


हेही वाचा

अनिल परब आक्रमक, किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा दाखल

संजय राऊत यांनी ५५ लाख ढापले, किरीट सोमय्यांचा आरोप

पुढील बातमी
इतर बातम्या