प्रसारमाध्यमांची गळचेपी सहन करणार नाही- भाजप

मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघड करत त्यात ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ या वाहिन्यांसोबतच ‘रिपब्लिक भारत’ या वृत्तवाहिनीचा देखील समावेश असल्याचा मोठा खुलासा गुरूवारी केला. पोलिसांच्या या कारवाईवर भाजपने जोरदार आक्षेप घेतला असून प्रसारमाध्यमांची गळचेपी भारतीय जनता सहन करणार नाही, असं केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. (bjp leader prakash javadekar slams mumbai police and maharashtra government over trp scam)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि मुंबई पोलिसांना भाजप नेत्यांकडून सातत्याने लक्ष्य करण्यात येत होतं. आघाडी सरकारमधील युवा मंत्र्याला वाचवण्यासाठी मुंबई पोलिसांवर सरकारकडून दबाव टाकला जात आहे, त्यामुळे मुंबई पोलीस जाणीवपूर्वक चुकीच्या दिशेने तपास करत आहेत, असं संशयाचं वातावरण निर्माण करण्यात आलं. 

याच जोडीला वृत्त वाहिन्या देखील मीडिया ट्रायल करून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना परस्पर दोषी ठरवून सर्वसामान्य प्रेक्षकांना संभ्रमात टाकत होत्या. रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वारंवार एकेरी उल्लेख करून त्यांना आव्हान देत होते. या सगळ्या प्रकारानंतर एम्सचा अहवाल आला. त्यात सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू हा आत्महत्येमुळेच झाल्याचं नमूद करण्यात आलं शिवाय सीबीआयने देखील त्याला दुजाेरा दिल्याने सत्ताधारी पुन्हा आक्रमक झाले.

हेही वाचा- फेक टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश, २ वृत्तवाहिनीच्या मालकांना अटक

दरम्यान मुंबई पोलिसांनी तपास करून महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर ८० हजार बनावट खाती तयार करण्यात आली. ‘रिपब्लिक भारत’, ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांनी घरोघरी पैसे वाटून टीआरपी घोटाळा केल्याची माहिती उघड केली. या प्रकरणी दोन्ही वाहिन्यांच्या मालकांना अटक करण्यात आली असून अर्णब गोस्वामींची कधीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

त्यावर प्रतिक्रिया देताना, प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य हे आपल्या लोकशाहीचं वैशिष्ट्य असून घटनेतलं आदर्श तत्व आहे. प्रसारमाध्यमांची गळचेपी भारतीय जनता सहन करणार नाही. काँग्रेस व तिचे सहकारी पक्ष प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत. हे लोकशाहीच्या मूल्यांविरोधात असून अस्वीकारार्ह आहे,असं ट्विट प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे.

तर, माध्यमांच्या विरोधात कारवाई केल्याने अपयश लपवता येईल, असं कॉंग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षाला वाटत असेल, तर ही त्यांची चूक आहे. लोकशाही काय आहे हे त्यांनी शिकायला हवं, असं मत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी व्यक्त केलं आहे. 

हेही वाचा- असा केला जातो टीआरपीद्वारे गैरव्यवहार
पुढील बातमी
इतर बातम्या