फेक टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश, २ वृत्तवाहिनीच्या मालकांना अटक

पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन तीन माध्यमांनी गोपनीय माहितीचा वापर स्वत:च्या वृत्तवाहिनीचा टीआरपी वाढवण्यासाठी केल्याची धक्कादायक माहिती दिली.

फेक टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश, २ वृत्तवाहिनीच्या मालकांना अटक
SHARES

मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी १ लाखाहून अधिक फेक अकाऊंट सोशल मीडियावर उघडण्यात आली असल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वीच मुंबईचे पोलीस आय़ुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. आता पुन्हा एकदा माध्यमांच्या टीआरपीबद्दल आणखी एक खुलासा पोलीस आयुक्तांनी केली आहे. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन तीन माध्यमांनी गोपनीय माहितीचा वापर स्वत:च्या वृत्तवाहिनीचा टीआरपी वाढवण्यासाठी केल्याची धक्कादायक माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. त्यात दोन वृत्तवाहिनीच्या मालकांचा समावेश आहेे.

मुंबई पोलिसांनी नुकतंच एक खोटा टीआरपी मिळवण्याचं रॅकेट उद्धवस्त केलं. यामध्ये रिपब्लिक भारत, फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस या वाहिनींचा समावेश आहे. या वाहिन्यांनी खोटा टीआरपी मिळवला होता असं मुंबई पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं आहे. माध्यमांचा टीआरपी बीएआरसी नावाची संस्था ठरवत असते. बीएआरसीने हे कंञाट हंसा नावाच्या संस्थेला दिलं होतं. मात्र हंसा कंपनीतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या तीन वाहिन्यांनी हा गैरप्रकार केल्याचे समोर आलं आहे. 

जून महिन्यात आरोपींचा हा सहभाग निश्चित झाल्यनंतर दोन कर्मचाऱ्यांना हंसा कंपनीने काढून टाकलें होते. पोलिसांनी दोन आरोपींना चौकशीसाठी बोलावले होते. या दोघांनी चौकशीत खोट्या टीआरपीच्या रॅकेटची कबूली दिली. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या सीआयूच्या पथकाने दोघांना अटक केली.

रिपब्लिक भारत बरोबरच फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस हे दोन चॅनेल्ससुद्धा फेक टीआरपी प्रकरणात अडचणीत आली आहेत..फक्त मराठी आणि बॉक्स ऑफिस चॅनेलच्या मालकांना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. मात्र रिपब्लिक चॅनेल्सच्या मॅनेजमेंटची चौकशी करून पुढील कारवाई करणार असल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं. 

मुंबईतील १८०० घरामध्ये पैसे देऊन हे चॅनेल्स चालू ठेवावेत असं सांगण्यात आलं होतं. महिन्याला ४०० ते ५०० रुपये या लोकांना देऊन टीआरपी वाढवण्यात आला असा खुलासा पोलिसांनी केला आहे. हे रॅकेट फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात सुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

शिवाय सुशांत सिंह प्रकरणावरून मुंबई पोलिसांनी टार्गेट करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्यात आल्या आणि पोलिसांना बदनाम करण्यात आलं. या चॅनेल्सच्या फेक टीआरपी प्रकरणात चॅनेल मॅनेजमेंटमधील कोणीही आणि कोणत्याही पदावर असलं तरी हा गुन्हा करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही अस पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केलं.

या प्रकरणात येत्या दोन दिवसात रिपब्लिक भारतच्या मॅनेजमेंटमधील लोकांची चौकशी केली जाणार आहे. अर्णब गोस्वामी यांचीदेखील चौकशी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रिपब्लिक भारतने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे फेक टीआरपी प्रकरणात मुंबई पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचं आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा