विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ चा शिक्का कसा? आशिष शेलारांचा सरकारला सवाल

अमरावतीतील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ असा शेरा आढळून आल्याचा गंभीर प्रकार नुकताच समोर आला होता. हा प्रकार म्हणजे विद्यार्थ्यांची अवहेलना असून कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मनस्ताप देणाऱ्यांवर आधी कारवाई करा, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. 

यासंदर्भात बोलताना आशिष शेलार म्हणाले की, अमरावतीतील कृषी विद्यालयात विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ चा स्टॅम्प मारला. विद्यार्थ्यांची अवहेलना केली. या विषयाकडे राज्य सरकार गंभीरपणे पाहात नाहीय. केवळ चौकशी या सगळ्या प्रकारावरची बोळवण आहे. १ जूनला आम्ही पत्र लिहून या पद्धतीची भीती व्यक्त केली होती. त्यानंतरसुद्धा राज्यातील एका कृषी विद्यालयाने कोविड १९ चा स्टॅम्प मारून गुणपत्रिका देत असेल, तर या प्रकरणात दोषींवर सर्वात पहिली कारवाई झाली पाहिजे, आधी त्यांचं निलंबन झालं पाहिजे मग चौकशी ही आमची मागणी आहे. केवळ चौकशी करणं ही बोळवण आहे. राज्य सरकार कुणाला तरी पाठिशी घालू पाहतंय, राज्य सरकार संशयीत वातावरण का निर्माण करतंय? असा आमचा राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना सवाल आहे.

हेही वाचा - विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ उल्लेख असल्यास कारवाई

अमरावती कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड १९ असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची गंभीर दखल दादाजी भुसे यांनी घेतली आहे. यासंदर्भात राज्य  शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख  करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश देखील भुसे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत.

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कृषी विद्यापीठासहीत राज्यातील इतर सर्व विद्यापीठाच्या व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. परीक्षा रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी गुणांच्या आधारे ठराविक सूत्र वापरुन गुणपत्रिका देण्यात येणार आहे. अशा गुणपत्रिकेवर कोविड १९ चा उल्लेख असेल, तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिला आहे.  

हेही वाचा - University Exams 2020: हा अहंकाराचा मुद्दा बनवू नका, परीक्षा घेण्यावरून आदित्य ठाकरेंची यूजीसीवर टीका
पुढील बातमी
इतर बातम्या