परमबीर सिंह यांच्या लेटरबाॅम्बवरून लोकसभेतही राडा, भाजप खासदारांनी केली 'ही' मागणी

 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचे सोमवारी लोकसभेतही पडसाद उमटले. भाजपच्या काही खासदारांनी परमबीर सिंग यांनी दिलेल्या पत्राचा मुद्दा लोकसभेत उपस्थित करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. 

परमबीर सिंह यांच्या पत्राचा मुद्दा उपस्थित करत भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. बापट यांच्याबरोबरच खासदार मनोज कोटक, पूनम महाजन आणि नवनीत राणा यांनीही राज्य सरकारवर टीका केली. 

“महाराष्ट्रात आजपर्यंत गुन्हेगार खंडणी मागत होते. आता सरकार खंडणी मागायला लागलं आहे. खंडणीखोर पोलिसांना मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आहे. म्हणजे कुंपणच शेत खात आहे. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करून गुन्हेगारांना आतमध्ये टाका, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली.

हेही वाचा- अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करा; परमबीर सिंह सुप्रीम कोर्टात

तर मनोज कोटक यांनी, महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात गृहमंत्री एका एपीआय रँकच्या पोलीस अधिकाऱ्याला बोलावून मुंबईतील बार आणि रेस्टाॅरंट्सकडून १०० कोटी रुपयांची खंडणी मागणी करतात. दुसरीकडे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकं सापडल्याप्रकरणी हाच अधिकारी एनआयएच्या अटकेत जातो. हा सगळा प्रकार अत्यंत संशयास्पद असून याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना काहीच माहिती नसणं देखील आर्श्चयजनक आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाेबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली. 

या मागणीला विरोध करत पंजाबमधील लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंह यांनी भाजपला मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्र तोडायचा आहे. हे खपवून घेतलं जाणार नाही, असं म्हणत भाजपवर टीकास्त्र डागलं. 

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख निलंबित पोलीस सहाय्यक निरिक्षक सचिन वाझे यांना भेटलेच नसल्याने माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे आरोप खोटे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत असतानाच परमबीर सिंह यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुरावे नष्ट करण्याआधीच अनिल देशमुख यांची खंडणी आणि भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. परमबीर सिंह यांची बाजू ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी मांडणार आहेत.

हेही वाचा- अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, शरद पवार यांनी मागणी फेटाळली

पुढील बातमी
इतर बातम्या