अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करा; परमबीर सिंह सुप्रीम कोर्टात

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे आरोप खोटे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत असतानाच परमबीर सिंह यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करा; परमबीर सिंह सुप्रीम कोर्टात
SHARES

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) निलंबित पोलीस सहाय्यक निरिक्षक सचिन वाझे यांना भेटलेच नसल्याने माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे आरोप खोटे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत असतानाच परमबीर सिंह यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुरावे नष्ट करण्याआधीच अनिल देशमुख यांची खंडणी आणि भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी याचिकेतून केली आहे. परमबीर सिंह यांची बाजू ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी मांडणार आहेत.

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray)यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईतील बार आणि रेस्टाॅरंट्सकडून दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. गृहमंत्री देशमुख आपल्याला पूर्वकल्पना न देताच माझ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवत असत, पोलीस खात्यातील हा ढवळाढवळ करण्याचा प्रकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन करणारा आहे, असं देखील सिंह यांनी म्हटलं होतं.

या लेटरबॉम्बनंतर अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक भाजपकडून होऊ लागली आहे. मात्र अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्धवत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही मागणी धुडकावून लावली आहे. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेट झाल्याचा दावा चुकीचा आहे. कारण कोरोनाच्या संसर्गामुळे अनिल देशमुख नागपूरच्या रुग्णालयात ५ ते १५ फेब्रुवारी दरम्यान दाखल होते. त्यानंतर घरीच विलगीकरणात होते. 

हेही वाचा- अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, शरद पवार यांनी मागणी फेटाळली

परमबीर सिंग यांच्या पत्राच्या माध्यमातून उभं करण्यात येत असलेलं चित्र म्हणजे राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा कट आहे. परमबीर सिंग यांचे आरोप निराधार, खोटे असल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, असंही शरद पवार (sharad pawar) यांनी सांगितलं.

तर सोमवारीच परमबीर सिंह सर्वोच्च न्यायालयात गेल्याने राष्ट्रवादीपुढे (ncp) मोठा पेच निर्माण झाला आहे. १०० कोटी रुपये खंडणी गोळा करण्याच्या उल्लेखासोबतच  २४-२५ ऑगस्ट २०२० रोजी राज्याच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालक आणि महासंचालकांनी गृहमंत्रालयाच्या मुख्य सचिवांना अनिल देशमुख हे बदली आणि नियुक्तीसाठी भ्रष्टाचार करत असल्याची माहिती दिली होती. ही माहिती दूरध्वनीवरून झालेल्या संभाषणाचं रेकाॅर्डिंग करून मिळवण्यात आली होती, असं सिंह यांनी आपल्या याचिकेत नमूद केलं आहे.

त्यामुळे पुरावे नष्ट करण्याआधीच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात खंडणी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. 

(ips officer param bir singh demands in supreme court for cbi enquiry of anil deshmukh in corruption case)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा