Advertisement

परमबीर सिंह यांचा लेटरबाॅम्ब कुणाला खूश करण्यासाठी?

पोलीस आयुक्तपदावरून काढल्यानंतरच परमबीर सिंह यांनी हे पत्र कसं काय लिहिलं? कुणाला तरी खूश करण्याचा प्रयत्न यातून दिसतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देशमुख यांची पाठराखण केली.

परमबीर सिंह यांचा लेटरबाॅम्ब कुणाला खूश करण्यासाठी?
SHARES

गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांनी २० मार्चला मुख्यमंत्र्याना हे पत्र लिहलं आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबई पोलिसांना महिन्याला १०० कोटी रुपयांचा फंड गोळा करण्याचे निर्देश दिल्याचा खळबळजनक आरोप केला. हे पत्र माध्यमांपर्यंत पोहोचल्यावर राजकीय वर्तुळात आणि पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रानंतर विरोधी पक्ष भाजपकडून अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. 

तर, दुसरीकडे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणापासून लक्ष विचलित करण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर हे आरोप केले जात आहेत का? पोलीस आयुक्तपदावरून काढल्यानंतरच परमबीर सिंह यांनी हे पत्र कसं काय लिहिलं? कुणाला तरी खूश करण्याचा प्रयत्न यातून दिसतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी देशमुख यांची पाठराखण केली.

मुंबई पोलीस दलातील निलंबित सहायक पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना अँटिलिया स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतल्यानंतर राज्य सरकारने परमबीर सिंह (Parambir Singh) यांना मुंबई पोलीस दलाच्या आयुक्तपदावरून दूर केलं होतं. 

त्यानंतर अचानक करण्यात आलेल्या या आरोपांमुळे राज्यभरात चर्चांना ऊत आला आहे.

नेमकं काय आहे पत्रात?

- उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकप्रकरणी २५ फेब्रुवारीला गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा तपास एनआयए आणि एटीएसकडे होता. या तपासासाठी माझ्याकडून आणि माझ्या कार्यालयाकडून दोन्ही तपास यंत्रणांना सहकार्य करण्यात आलं. 

- सचिन वाझे हे क्राइम इंटिलिजन्सचं युनिटचे प्रमुख होते. मागील काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अनेकदा वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वरी या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला १०० कोटी रुपये जमा करण्यास सांगितले. त्यावेळी गृहमंत्र्यांचे खासगी सचिव पलांडे हे देखील हजर होते. मुंबईत साधारण १,७५० बार, हॉटेल्स आहेत. त्यांच्याकडून प्रत्येकी २ ते ३ लाख जमवले जाऊ शकतात. अशा पद्धतीने त्यांच्याकडून ४०-५० कोटी रुपये जमा होऊ शकतात आणि बाकी रक्कम इतर माध्यमातून जमा केली जाऊ शकते, असंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा- मुंबईतील ‘या’ भागात १२ तास पाणीपुरवठा बंद

- सचिन वाझे यांनी जेव्हा मला हे सांगितलं तेव्हा हे ऐकून मला धक्काच बसला. ही परिस्थिती कशी हाताळायची याचा विचार मी करायला लागलो.

- त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवंसापूर्वी समाज सेवा विभागाचे एसीपी संजय पाटील यांना हुक्का पार्लर विषयी चर्चा करण्यासाठी आपल्या शासकीय निवास्थानी बोलवलं. तिथं त्यांचे स्वीय सहाय्यक पालांडे उपस्थित होते. त्यानंतर दोनच दिवसांनी डीसीपी भुजबळांसोबत एसीपी पाटील गृहमंत्र्याच्या कार्यालयाबाहेर वाट पाहत होते, तेव्हा पलांडेंनी त्यांना सांगितलं की गृहमंत्र्यांना ४० ते ५० कोटी रुपये हवे आहेत, जे मुंबईतील साधारण १७५० बार, रेस्टाॅरंट मार्फत जमवले जाऊ शकतात. एसीपी पाटील यांनी हे काम करावं, असं गृहमंत्र्यांनी सांगितल्याची माहिती पाटील यांनी मला दिली.

- गृहमंत्री देशमुख आपल्याला पूर्वकल्पना न देताच माझ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलवत असत, माझ्या अधिकाऱ्यांना वाट पाहायला लावत असत. 

- मोहन डेलकर यांच्या आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या घटना दादरा-नगर हवेली इथं घडलेल्या असल्याने गुन्ह्याची नोंद तिथंच व्हायला पाहिजे होती. कायदेशीर बाजू तपासल्यानंतर मी या मतावर आलो होतो. मात्र अनिल देशमुखांनी मुंबईतच आत्महत्येसाठी प्रवृत्त झाल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकला. या प्रकरणावर गृहमंत्री माझ्यावर नाराज होते. तरीसुद्धा त्यांनी एक एसआयटी स्थापन करण्याची घोषणा विधानसभेत केली.   

- अँटिलिया प्रकरणाबाबत मार्च महिन्यात 'वर्षा' बंगल्यावरील एका बैठकीत मी आपल्याला या प्रकरणात गृहमंत्र्यांनी केलेल्या काही चुका आणि गैरव्यवहारासंबंधी माहिती दिली होती. तशीच कल्पना मी राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर ज्येष्ठ मंत्र्यांनासुद्धा दिली होती. त्या वेळेस मला असं लक्षात आलं की काही मंत्र्यांना मी सांगत असलेल्या गोष्टींची आधीच कल्पना होती.

- त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांना मुलाखत देताना म्हटलं की माझ्याकडून आणि माझ्या कार्यालयाकडून अँटिलिया तपास प्रकरणात काही गंभीर चुका झाल्या आहेत. आणि त्या चुका अक्षम्य असल्याने माझी बदली करण्यात आली.      

- आयुक्त म्हणून मी पूर्ण जबाबदारी घेतो; पण पोलीस व्यवस्थेतील या हस्तक्षेपामुळे घडणाऱ्या चुकांची जबाबदारी त्या चुकीच्या व्यक्तींकडे जाते. 

(ncp maharashtra chief jayant patil reaction on param bir singh letter)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा