शिवसेनेला उपसभापतीपदाचं आमिष, संजय राऊतांच्या नावाची चर्चा

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करत शिवसेनेनं भाजपाची डोकेदुखी चांगली वाढवली आहे. ही डोकेदुखी कमी करत शिवसेनेचं मन वळवण्यासाठी आता थेट केंद्रातूनच हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातूनच सेनेला थेट राज्यसभेच्या उपसभापतीपदाची आॅफर देण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. एवढंच नव्हे, तर या पदासाठी खासदार संजय राऊत यांचं नाव घेतलं जात आहे.

नाराजी दूर करण्यासाठी

राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारवरही शिवसेना प्रचंड नाराज असून रोज कोणत्या ना कोणत्या मुद्यावर शिवसेना भाजपा सरकारला टार्गेट करताना दिसत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वीच चंंद्रबाबू नायडू यांची तेलगू देसम पार्टी एनडीएतून बाहेर पडली आहे. एकूणच मित्रपक्षांमध्ये प्रचंड नाराजी असून ही नाराजी २०१९ च्या निवडणुकीत परवडणारी नसल्यानं सेनेला राज्यसभेच्या उपसभापती पदाचं आमिष दाखवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

अधिकृत प्रतिक्रिया नाही

केंद्राकडून उपसभापती पद देण्यासंबंधीचा प्रस्ताव शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती आहे. पण शिवसेनेने याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

राऊतांचं पारडं जड

राज्यसभेत शिवसेनेचे सध्या संजय राऊत, अनिल देसाई आणि राजकुमार धूत हे तीन खासदार असून या तिघांमध्ये संजय राऊतांची बाजू उजवी आहे. त्यामुळे सेनेनं जर ही आॅफर स्वीकारली तर संजय राऊतांची राज्यसभेच्या उपसभापतीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. आता शिवसेना ही आॅफर स्वीकारते का? हे लवकरच समजेल.

राज्यसभेचे विद्यमान उपसभापती पी. जे. कुरियन यांचा कार्यकाळ लवकरच पूर्ण होत आहे. हे पद मित्रपक्षाला देण्याचा भाजपाचा विचार असून त्यातूनच शिवसेनेला ही आॅफर देण्यात आल्याची चर्चा आहे.


हेही वाचा-

युतीत पुन्हा मिठाचा खडा

युतीच्या चर्चेची जबाबदारी मुनगंटीवारांवर?

कर्नाटकात धनुष्यबाण सुटणार, शिवसेना लढवणार ५०-५५ जागा


पुढील बातमी
इतर बातम्या