Advertisement

युतीत पुन्हा मिठाचा खडा


युतीत पुन्हा मिठाचा खडा
SHARES

शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढण्याची भाषा केली असली तरी भाजप-शिवसेना युती व्हावी हे दोन्ही पक्षांतील अनेकांची इच्छा आहे. त्याचबरोबर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी युती झालीच पाहिजे, अशी इच्छा सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली होती. त्यांचे त्या दृष्टीने प्रयत्न चालू असताना आज त्या प्रयत्नात मिठाचा खडा पडला आहे. त्यामुळे सेना-भाजपच्या युतीचं नक्की काय होणार आता हे साक्षात परमेश्वरही सांगू शकेल की नाही, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.


आणि उद्धव ठाकरे निघून गेले

खरेतर आमदार निधी वाटपाचा विषय घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेणार होते. त्या पार्श्वभूमीवर ते त्यांची वाट शिवालय येथे पाहत होते. मात्र मुख्यमंत्री सभागृहाच्या कामकाजात व्यस्त असल्याने मुख्यमंत्र्यांनी ५ वाजता मग ६ वाजता मग ७ वाजताची वेळ दिली. अखेर पूर्वनियोजित कार्यक्रमाचं कारण देत उद्धव ठाकरे निघून गेल्याने दोघांची भेट रद्द झाली. त्यामुळे आता या रद्द झालेल्या भेटीचे काय परिणाम होईल, याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.


उद्धव-मुख्यमंत्री यांची दूरध्वनी बैठक

शिवसेना आमदारांच्या निधीसंदर्भात काही विषय मांडण्यासाठी उद्धव ठाकरे बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार होते. मात्र सभागृहात वेळ लागणार असल्याने त्यांचे मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलणे झाले आणि त्यांच्या निवेदनावर योग्य लक्ष देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं, असा खुलासा करण्यात येत आहे.


नारायण राणे विधानभवनात

उद्धव ठाकरे यांच्याशी मुख्यमंत्र्यांची नियोजित भेट रद्द झाली. मात्र यामध्ये सगळ्यांच्या भुवया उंचावल्या त्या नारायण राणे यांच्या विधानभवनात झालेल्या एन्ट्री ने. उद्धव ठाकरे येणार येणार अशा चर्चा सुरू असताना नारायण राणे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात वाट पाहत होते. मुख्यमंत्र्यांची त्याच्याशी भेट झाली नसल्याने ते ही थोड्या वेळाने निघून गेले. मात्र उद्धव ठाकरे भेटीसाठी येणार असताना नेमके राणे कसे पोहचले, असा प्रश्न विधानभवन परिसरात चवीने चघळला जात आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा