नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपाने वापरला मोपलवारांचा पैसा - नवाब मलिक

नांदेड महापालिका निवडणुकीचा विजयी कल समोर येऊ लागताच काँग्रेस, राष्ट्रवादीकडून भाजपावर करण्यात येणाऱ्या टीकेचा माराही तीव्र होऊ लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपाने वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचा समृद्धीतून कमावलेला पैसा नांदेड महापालिका निवडणुकीत वापरल्याचा गंभीर आरोप केला आहे. 

नांदेडची संपूर्ण धुरा भाजपने आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्यावर सोपवली होती. त्याच चिखलीकरांच्या बहिणीचे जावई आयपीएस अधिकारी प्रविण पडवळ यांना मोपलवार यांच्याविरोधातील चौकशी समितीत घेण्यात आलं आहे. मोपलवार मूळचे नांदेडचे असून आपल्यावरील आरोप धुण्यासाठी नांदेड महापालिका निवडणुकीत मोपलवारांंनी भाजपासाठी ३०० कोटी रुपये खर्च केल्याचा मलिक यांचा आरोप आहे. तर पडवळ यांना त्वरीत चौकशी समितीतून बाहेर काढत मोपलवार यांची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणीही मलिक यांनी उचलून धरली आहे.

विजयाचा अश्वमेध लंगडा  

नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली आहे. त्याकडं पाहता भाजपाचा विजयाचा अश्वमेध आता लंगडा झाला आहे. दौऱ्यावर गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी या निकालानंतर नांदेडच्या जनतेचे खुल्या मनानं अभिनंदन करावं, अशी उपरोधिक टीकाही मलिक यांनी केली. पार्टी विथ डिफरन्स सांगणारा पक्ष सगळ्या पद्धतीनं निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र नांदेडच्या जनतेनं भाजपाला नकार दिला. यावरूनच देशातील वातावरण बदलत असल्याचं दिसत आहे, असंही मलिक म्हणाले.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

पुढील बातमी
इतर बातम्या