राधेश्याम मोपलवारांची गच्छंती

  Mumbai
  राधेश्याम मोपलवारांची गच्छंती
  मुंबई  -  

  कथित भ्रष्टाचारासंदर्भातील ऑडिओ क्लिप वायरल झाल्यानंतर विरोधकांच्या रडारवर असलेले राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि समृद्धी महामार्गाचे प्रकल्पप्रमुख राधेश्याम मोपलवार यांना पदावरून हटवण्यात आले आहे. चौकशी होईपर्यंत मोपलवार यांना पदावरून दूर करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. विरोधकांच्या भावनेचा आदर करत आपण हा निर्णय घेत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच दोन महिन्यांमध्ये चौकशी पूर्ण करण्यात येईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

  ऑडिओ सीडी प्रकरणावरून राधेश्याम मोपलवार यांना निलंबित करण्याच्या मागणीवरून काँग्रेस,राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ घातला. त्यामुळे पाच वेळा विधानसभा तहकूब करावी लागली होती.


  काय म्हणाले मुख्यमंत्री?

  एक महिन्याच्या आत फाॅरेन्सिक चौकशी करण्यात येईल, असे आपण कालच सांगितले आहे. पण विरोधी बाकांवरून मोपलवारांना हटवण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे मोपलवारांना चौकशी होईपर्यंत पदावरून बाजूला करण्यात येईल, हा निर्णय जाहीर करताना आता विरोधी पक्षांत असलेल्यांच्या सत्ताकाळातले हे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार करण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी साधली.  


  विरोधक वेलमध्ये उतरले

  'काय वाट्टेल ते करा. सरकार माझे  काहीही बिघडवू शकत नाही' असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन विरोधक वेलमध्ये उतरले.  


  विरोधी पक्षनेते, गटनेत्यांची आक्रमक भाषणे


  भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी 15 फेब्रुवारीला या मोपलवार विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र लिहिलं? तरी सरकार त्यांना का पाठीशी घालत आहे?

  राधकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा


  मोपलवार यांना नंतर चीफ सेक्रेटरी करा. आमचं काही म्हणणं नाही. पण आता त्यांच्याकडे संशयाची सुई आहे. त्यांच्यावर कारवाई करा.

  जयंत पाटील, गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.