समृद्धीविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, 10 ऑगस्टला धडकणार आझाद मैदानावर

  Mumbai
  समृद्धीविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार, 10 ऑगस्टला धडकणार आझाद मैदानावर
  मुंबई  -  

  समृद्धी महाममार्गाच्या नावावर नेमकी कुणाची समृद्धी सुरू आहे असा प्रश्न उपस्थित करत शेतकरी आक्रमक झाले आहेत. सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असून शेतकऱ्यांच्या सरणावरून जाणारा हा समृद्धी महामार्ग त्वरीत रद्द करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. पण या मागणीकडे काणाडोळा करणाऱ्या सरकारला दणका देण्यासाठी आता शेतकरी 10 ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर धडकणार असल्याची माहिती समृद्धी महामार्गबाधीत शेतकरी संघर्ष समितीचे राजू देसले यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.

  मुंबई ते नागपूर अशा अंदाजे 700 किमी सुपर एक्स्प्रेस अर्थात समृद्धी महामार्गाचा घाट सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून घातला आहे. यासाठी 10 जिल्ह्यातील 30 तालुक्यांमधील 354 गावांतील सुमारे 20 हजार 820 हेक्टर जागा संपादीत करण्यात येणार आहे. मात्र या सुपीक शेतजमिनी असून या जमिनी गेल्या तर शेतकऱ्यांनी करायचे काय असे म्हणत शेतकऱ्यांनी या जमिनी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. आता या विरोधाचे एका मोठ्या लढ्यात रुपांतर झाले आहे. शेतकऱ्यांचा विरोध डावलत, त्यांची फसवणूक करत, जबरदस्तीने जमिन संपादीत केला जात असल्याचा आरोप करत 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला आहे.

  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय रस्ता होऊ देणार नाही असे जाहीर आश्वासन काही दिवसांपीर्वी दिले होते. असे असताना शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या जात असल्याने शेतकरी आता आणखी आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात करून दाखवला असा आरोपही आता शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी सोमवारी नाशिकमध्ये शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत 10 ऑगस्टला आझाद मैदानावर धडकण्याचा निर्णय घेतला आहे.


  अशा आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या


  • अस्तित्वात असलेल्या दोन मुंबई-नागपुर महामार्गाचे चौपदरीकरण करावे
  • भूसंपादन कायदा 2013 ची अंमलबजावणी करावी
  • 10 जिल्ह्यांमध्ये शेतकर्यांवर दाखल केलेले गुन्हे रद्द करावेत
  • जबरदस्तीने सुरू असलेली जमिन संपादन प्रक्रिया त्वरीत रद्द करावी
  • समृद्धीबाधित शेतकर्यांच्या हरकतींवर त्वरीत सुनावणी घ्यावी


  पावसाळी अधिवेशनात समृद्धीचा मुद्दा उचलला जावा आणि हा प्रकल्प रद्द व्हावा यासाठी आता जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार आहे. 10 जिल्ह्यांतील खासदार-आमदारांच्या भेटी घेत त्यांच्याशी चर्चा करत हा विषय अधिवेशनात उचलण्याची मागणी करण्यात येणार आहे.


  'या प्रकल्पात मलेशिया सरकारही होणार सहभागी'

  समृद्धी महामार्गाच्या या प्रकल्पात आता मलेशिया सरकारने सहभागी होण्याची तयारी दाखविली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.समृद्धी महामार्गाचे सादरीकरण पाहून खूपच प्रभावित झाल्याचे मलेशियाच्या बांधकाम मंत्रालयाचे सचिव झोहारी हाजी अकोब यांनी यावेळी सांगितले.  मलेशिया सरकारचे शिष्ट मंडळ भेटले बांधकाम मंत्र्यांना

  मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिंदे यांची मलेशियाच्या एका शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी समृद्धी महामार्गाची माहिती दिली. भारत आणि मलेशियाचे फार जुने संबंध असून, विविध क्षेत्रात त्यांनी सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट कामाचा ठसा उमटवला आहे. विशेषत: रस्ते, पूल, भुयारी मार्ग कामात त्यांनी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरून मजबूत आणि सुरक्षित रस्ते तयार केले आहेत. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पात काम करण्याची मलेशियाने तयारी दाखवली ही आनंदाची गोष्ट आहे. समृद्धी महामार्गाबरोबरच अन्य रस्त्यांच्या प्रकल्पातदेखील सोबत काम करू, असेही त्यांनी यावेळी सांगितल्याचे एकनाथ ‌शिंदे यांनी सांगितले.


  जमिनी बाधित होऊ देणार नाही -

  औरंगाबाद येथून जाणाऱ्या समुद्धी महामार्गामुळे काही शेतकऱ्यांच्या फळबागांच्या जमिनी बाधित होत असल्याने त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सोमवारी भेट घेतली. त्यावर कोणत्याही परिस्थितीत या जमिनी बाधित होऊ देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच शिवसेनेच्या मंत्र्यांनी संबंधित भागाचा दौरा करावा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.  हेही वाचा -

  समृद्धी महामार्ग: ऑक्टोबरला काम सुरू, 2020 ला मुंबई-नागपूर 8 तासांत

  शेतकऱ्यांच्या संतापाचा पुन्हा उद्रेक, पोलिसांची व्हॅन पेटवून दिली  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.