लवकरच दुसरा मुख्यमंत्री येईल, कंगनाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र तुमच्या मालकीचा असल्यासारखं वागू नका. तुम्ही फक्त जनतेचे सेवक आहात. तुमच्या आधीही या पदावर कुणीतरी होता आणि लवकरच दुसरा कुणीतरी येईल, असं म्हणत अभिनेत्री कंगना रणौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी कंगनावर जोरदार टीका केली होती.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून मुंबई पोलिसांना सातत्याने लक्ष्य करणाऱ्या कंगनाने मुंबईची पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना करताच शिवसेनेने कंगनाचा समाचार घेतला होता. शिवसेना खासदार संजय राऊत आणि पाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कंगनाने एकेरी शब्दांत उल्लेख केल्यानंतर तर शिवसैनिक जाम भडकले होते. ठाण्यात कंगनाचे पोस्टर्स जाळण्यात आले, तर ती मुंबईत दाखल होताच तिच्याविरोधात निदर्शनेही करण्यात आली. मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने कंगनाला थेट वाय दर्जाची सुरक्षा पुरवली. तर दुसऱ्या बाजूला मुंबई महापालिकेने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करताच शिवसेनेवर सूडाचं राजकारण केल्याचेही आरोप झाले. (bollywood actress kangana ranaut replies cm uddhav thackeray dussehra rally speech)

या सगळ्या प्रकारादरम्यान शांत असलेल्या उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच भाष्य केलं. विजयादशमीला रामाने रावणाचा वध केला. तो दहा तोंडांचा रावण दहा तोंडांनी महाराष्ट्रावर चालून आला आहे. एक रावणाचं तोंड म्हणतंय मुंबई पाकव्याप्त कश्मीर झाला आहे. मोदींनी पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानात आणण्याची घोषणा केली होती. पाकव्याप्त कश्मीर सोडून द्या, पण ३७० कलम ज्या कश्मीरात काढलंय तिथली एक इंच जमीन अधिकृतपणे घेऊन दाखवा आणि मग आमच्या अंगावर या. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं आणि वर दाखवायचं की आम्ही कष्ट केलेले आहेत. मुंबई महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची. असली ही सगळी रावणी अवलाद.

हेही वाचा - शिवसेना मुंबईचा लचका महाराष्ट्र द्वेष्ट्यांना तोडू देणार नाही- उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात जणू काही कायदा सुव्यवस्था अस्तित्वातच नाही. मुंबई पोलीस हे जणू काही निकम्मे आहेत. ते काही काम करत नाहीत. महाराष्ट्रात शिवाजी पार्क असेल इकडे तिकडे गांजाची शेतीच फुललेली आहे, असं चित्र निर्माण करायचं. त्यांना माहिती नाहीय अजून महाराष्ट्राची संस्कृती. या संस्कृतीत आमच्या घराघरामध्ये तुळशीची वृंदावन आहेत, गांजाची नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या कंगना रणौतचा समाचार घेतला होता.

त्याला कंगनाने ट्विट करून प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना महाराष्ट्राचं ठेकेदार कुणी बनवलं? हे फक्त जनतेचे सेवक आहेत. यांच्या आधीही कुणीतरी होतं. लवकरच हे जातील आणि त्यांच्या जागी राज्याची सेवा करण्यासाठी दुसरं कुणीतरी येईल. ते महाराष्ट्राचे मालक असल्यासारखं का वागत आहेत?

मुख्यमंत्री तुम्हाला स्वत:ला लाज वाटली पाहिजे. जनतेचे सेवक असूनही तुम्ही अशाप्रकारे लढत आहात. तुमच्याकडील सत्तेचा वापर तुम्ही जे तुमच्याशी सहमत नाहीत, अशा लोकांचं नुकसान, अपमान करण्यासाठी करत आहात. असलं घाणेरडं राजकारण करून ज्या खर्चीवर तुम्ही बसला आहात, त्याच्या लायक तुम्ही नाहीत, अशी टीका कंगनाने केली आहे.

हेही वाचा - पोलिसांच्या समन्सला कंगनाने दिलं सोशल मिडियावरून हे उत्तर
पुढील बातमी
इतर बातम्या