ही दंडुकेशाही राज्यात चालणार नाही, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला इशारा

सेना भवनासमोर जो प्रकार घडला, त्या सर्वांवर पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे. ही दंडुकेशाही राज्यात चालणार नाही, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला इशारा दिला. शिवसेना भवनसमोर झालेल्या भाजप-शिवसेना राड्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, काल मुंबईतील सेना भवनसमोर जे झालं. त्याकडे पाहता आता निदर्शनेही करायची नाहीत का? आपला रोष व्यक्त करण्यासाठी तुम्ही रोज सामनामध्ये अग्रलेख लिहा, वाट्टेल त्या भाषेत बोला, त्याला काही आधार आहे का? परवानगी घेऊन २० कार्यकर्ते निदर्शने करत होते. त्यांच्या हातामध्ये दगड, धोंडे होत असं कुणी म्हणत असेल, तर सीसीटीव्ही समोर येऊ द्या सर्व स्पष्ट होईल. त्यांच्या हातामध्ये काहीही नव्हतं. पण त्यांना निदर्शने करून पोलिसांनी अटकदेखील केली आहे. 

हेही वाचा- शिवसेनेने सामना बंद करून बाबरनामा काढावा, अतुल भातखळकरांचा घणाघात

याआधी आमच्या भाजप कार्यालयासमोर देखील १५ दिवसांपूर्वी पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेकडून पोस्टर लावण्यात आले होते. काँग्रेसनेदेखील आमच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. मग आम्ही काय मारामाऱ्या केल्या का? त्यांनी त्यावेळी थोडा वेळ निदर्शने केली. काही वेळाने पोलीस त्यांना घेऊन गेले, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ही दंडुकेशाही चालणार नाही. राममंदिर हा विषय भाजप, विश्व हिंदू परिषद किंवा ट्रस्टचा नाही. तर राममंदिर हा विषय समस्त हिंदूंचा आहे. हिंदूंच्या विषयावर व्यक्त व्हावं असं आम्हाला वाटतं आणि तुम्हाला व्यक्त झालं नाही पाहिजे वाटतं. जिथं हिंदुत्व सोडलं तिथंच तर अंतर निर्माण होण्यास सुरुवात झाली ना. तुम्ही आमच्यावर टिप्पणी करणार, तुमचं हिंदुत्व खोटारडं असं म्हणणार, अतिशय मेहनतीने राम मंदिर उभं राहत आहे. पण रोज नवीन मुद्दे काढले जात जात आहेत. काँग्रेसने आणि देशविरोधी ताकदीने जे करायचं ते चालवलंच आहे. तुम्ही राष्ट्रीय बाण्याचे आणि हिंदुत्ववादी म्हणवून घेता. मग त्यांना तुम्ही पाठिंबा कसा देता, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

(chandrakant patil comment on shiv sena and bjp clash at shiv sena bhavan dadar)

हेही वाचा- शिवसेनेने आज आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली!, आशिष शेलारांचा निशाणा

पुढील बातमी
इतर बातम्या