प्रदेशाध्यक्ष बदलाचा प्रश्नच नाही, चंद्रकांत पाटलांचा खुलासा

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. खासकरून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार आणि चंद्रशेखर बावनकुळे पक्षातील वरिष्ठांच्या भेटीगाठी घेत असल्याने भाजपात प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यावर खुद्द चंद्रकांत पाटील यांनीच खुलासा केला आहे.

चंद्रकांत पाटील शनिवारपासून दिल्लीत आहेत. त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची रविवारी भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेला उत्तर दिलं. ते म्हणाले, प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांमध्ये ज्यांना तथ्य वाटतं खरं तर त्यांना भाजप काय आहे कळलेलं नाही. सर्वसामान्य माणसांनाही भाजप समजली पाहिजे, म्हणून सांगतो की, दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळलेला नाही. भाजपमध्ये तसं नाही. भाजप एका सिस्टिमने चालणारा पक्ष आहे. त्यामुळे भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- रेल्वे काय भाजपची नोकर आहे का?, संजय राऊत रावसाहेब दानवेंवर संतापले

तर दुसरीकडे  रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि इतर राजकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना एकट्यालाच बैठकीसाठी बोलवल्याने सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे. एखाद्या समाजाला मागास ठरविण्याचे अधिकार राज्यांना देणारं विधेयक संसदेत येत आहे. हे विधेयक लवकरात लवकर एकमताने मंजूर व्हावे, अशी मागणी अमित शाह यांच्याकडे केल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

त्याचसोबत आरक्षणावरील ५० टक्क्यांची मर्यादा उठवण्यासंदर्भातही भाजप नेत्यांची चर्चा अपेक्षित आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक ही भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. एकेकाळचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या हातून सत्ता कशी काढून घ्यायची, यासाठी भाजपकडून हरतऱ्हेचे प्रयत्न होत आहेत. त्यासाठी मनसेसोबत युती करायची किंवा नाही, यावरही चर्चा अपेक्षित आहे.

हेही वाचा- खाशाबा जाधव यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार का नाही?, शिवसेनेची मोदी सरकारवर टीका

पुढील बातमी
इतर बातम्या