Advertisement

खाशाबा जाधव यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार का नाही?, शिवसेनेची मोदी सरकारवर टीका

ऑलिम्पिकमध्ये आपल्या कुस्तीगीरांनी पदके जिंकली तेव्हा खाशाबा जाधव यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार व्हावा, असा सूज्ञ विचार कुणाच्या मनात का येऊ नये? असा प्रश्न विचारत शिवसेनेने मोदी सरकारला टोला हाणला आहे.

खाशाबा जाधव यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार का नाही?, शिवसेनेची मोदी सरकारवर टीका
SHARES

महाराष्ट्राचे खाशाबा जाधव यांचं कर्तृत्वही मोठेच आहे. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक जिंकणारे ते महान कुस्तीपटू होते. ऑलिम्पिकमध्ये आपल्या कुस्तीगीरांनी पदके जिंकली तेव्हा खाशाबा जाधव यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार व्हावा, असा सूज्ञ विचार कुणाच्या मनात का येऊ नये? असा प्रश्न विचारत शिवसेनेने (shiv sena) मोदी सरकारला टोला हाणला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून ते मे. ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं केलं आहे. यावरून केंद्रातील विरोधक खासकरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. त्यात शिवसेनेचीही भर पडली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दै. सामनातील अग्रलेखातून शिवसेनेची भूमिका मांडण्यात आली आहे.

त्यात नमूद केल्यानुसार, मे. ध्यानचंद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय खेळ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. ध्यानचंद यांच्या नावाने राष्ट्रीय पुरस्कारही प्रदान केले जातात. मेजर ध्यानचंद व त्यांचं क्रीडा क्षेत्रातील योगदान मोठंच आहे. ते एक उत्तम माणूस होते व पंडित नेहरूंशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे देशासाठी सर्वोच्च बलिदान करणाऱ्या राजीव गांधी यांचं नाव पुसून तेथे मेजर ध्यानचंद यांचं नाव लावणं हा ध्यानचंद यांचाही मोठा गौरव आहे, असं मानता येत नाही. 

राजीव गांधींचं नाव नको म्हणून ध्यानचंद यांचं नाव देणं हे द्वेषाचं राजकारण आहे. ध्यानचंद यांच्या नावाने आणखी एक मोठा पुरस्कार घोषित करता आला असता. तसं झालं असतं तर मोदी सरकारची वाहवाच झाली असती. आता भाजपमधील (bjp) राजकीय खिलाडी असं सांगत आहेत की, ‘राजीव गांधी यांनी कधी हातात हॉकीचा दांडा धरला होता काय?’ हा त्यांचा प्रश्न वाजवी आहे, पण अहमदाबादच्या सरदार पटेल स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदींच्या नावाने केलं. मग श्री. मोदी यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी पार पाडली? किंवा अरुण जेटली यांच्या नावाने दिल्लीत स्टेडियमचं नामकरण केलं. तेथेही तोच निकष लावता येईल, असा प्रश्न लोक विचारत आहेत. 

हेही वाचा- लोकल प्रवाशांचे ‘क्यू आर कोड’ तपासायचे कुणी?, रावसाहेब दानवेंनी जबाबदारी राज्याकडे ढकलली

क्रिकेट, फुटबॉलसारख्या खेळांचं प्रशासन आज गैर खेळाडूंच्याच हातात गेलं आहे, हे कसलं लक्षण मानायचं? ध्यानचंद हे मोठेच खेळाडू होते, पण ४१ वर्षे हॉकीत विजयाचा आणि पदकांचा दुष्काळ पडला असताना कुस्ती, बॉक्सिंग, बॅडमिंटन अशा खेळांत ज्या खेळाडूंनी वैयक्तिक पदके ऑलिम्पिकमधून आणली त्यांचं योगदान मेजर ध्यानचंद यांच्यापेक्षा कमी नाही.

मोदी सरकार आज ऑलिम्पिक पदकांचा उत्सव साजरा करीत आहे, पण मोदी सरकारने गेल्या काही वर्षांत ‘ऑलिम्पिक’चं बजेटच साधारण ३०० कोटींनी कापलं. हिंदुस्थानी महिला-पुरुष हॉकी संघाचे प्रायोजकत्व ‘सहारा’ने काढून घेतल्यावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दोन्ही हॉकी संघांचे पालकत्व स्वीकारलं. त्यामुळे ‘हॉकी’ यशाचे श्रेय जसे त्या संघाच्या मेहनतीस तितकंच ते ओडिशाच्या नवीन बाबूंचे आहे. 

पी. व्ही. सिंधू हिने तर सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिक पदक जिंकलं. महाराष्ट्राचे खाशाबा जाधव यांचे कर्तृत्वही मोठंच आहे. हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये पहिलं वैयक्तिक पदक जिंकणारे ते महान कुस्तीपटू होते. ऑलिम्पिकमध्ये आपल्या कुस्तीगीरांनी पदके जिंकली तेव्हा खाशाबा जाधव यांच्या नावाने खेलरत्न पुरस्कार व्हावा, असा सूज्ञ विचार कुणाच्या मनात का येऊ नये? ध्यानचंद हे हॉकीचे जादूगार, तसे खाशाबा हे कुस्तीचे जादूगार होतेच. लोकभावना वगैरे बोलायला ठीक आहे, पण सध्या राज्यकर्ते ठरवतात तीच लोकभावना व त्या लोकभावनेवर भजनाचे टाळ वाजवणे हेच सुरू आहे. 


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा