Advertisement

लोकल प्रवाशांचे ‘क्यू आर कोड’ तपासायचे कुणी?, रावसाहेब दानवेंनी जबाबदारी राज्याकडे ढकलली

क्यू आर कोड तपासण्याची यंत्रणा रेल्वे प्रशासनाकडे नाही. दोन्ही डोस घेतलेल्यांचा रेकॉर्ड सरकारकडेच आहे. त्यामुळे ही जबाबदारी राज्यानेच घेतली पाहिजे.

लोकल प्रवाशांचे ‘क्यू आर कोड’ तपासायचे कुणी?, रावसाहेब दानवेंनी जबाबदारी राज्याकडे ढकलली
SHARES

कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाणात आटोक्यात असल्याने मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांच्या प्रवासाचं मुख्य साधन असलेली ‘मुंबई लोकल’ची सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना केली. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना ही मुभा मिळणार आहे. यावर केंद्रातील रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की, कोरोना संकटात मुंबईची लोकल ट्रेन सेवा सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर लोकल ट्रेनची सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी राज्यातील भाजपकडून सातत्याने करण्यात येत होती. लोकल बंद असल्याने हातावर पोट असणाऱ्या सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत होते. त्यांचा विचार करत अखेर राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याबद्दल आम्हाला आनंदच आहे. 

हेही वाचा- लोकल प्रवासासाठी लागणारा पास; कुठे व कसा मिळणार? वाचा सविस्तर

मात्र कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात येणार आहे. ही परवानगी देण्याआधी किंवा त्याबद्दलची घोषणा करण्याआधी राज्य सरकारने आमच्याशी चर्चा केली असती, तर समन्वयाने चांगला मार्ग काढता आला असता. रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांना दोन्ही डोस घेतल्याचं प्रमाणपत्र मिळवून, त्यासाठी आवश्यक क्यू आर कोड घेऊनच पास मिळवता येणार आहे.  

परंतु हे क्यू आर कोड तपासण्याची यंत्रणा रेल्वे प्रशासनाकडे नाही. दोन्ही डोस घेतलेल्यांचा रेकॉर्ड सरकारकडेच आहे. त्यामुळे ही जबाबदारी राज्यानेच घेतली पाहिजे. राज्य सरकारने रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारावर क्यूआर कोड आणि पास तपासण्याची यंत्रणा उभारावी. ओळख पटल्यानंतर रेल्वे त्यांना सुरळीत प्रवास करु देईल, असं म्हणत रावसाहेब दानवेंनी (raosaheb danve) राज्यावर ही जबाबदारी ढकलली आहे.

लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या प्रवाशांना लोकल प्रवासासाठी आवश्यक क्यू आर कोड मिळतील. राज्य सरकारने त्यासाठी विशेष अॅप तयार केला आहे. ज्या प्रवाशांकडे स्मार्ट फोन नसेल, त्यांना महापालिकेच्या विभागीय कार्यालयात हे क्यू आर कोड आॅफलाइन पद्धतीने मिळतील. त्यासाठी अ‍ॅपवर किंवा कार्यालयात लसीकरण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र सादर करावं लागेल. हे क्यूआर कोड दाखवल्यावरच रेल्वे तिकीट खिडकीवर मासिक पास अथवा दैनंदिन तिकीट मिळू शकेल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा