'त्या' सफाई कामगारांना सेवेत सामावून घ्या- मुख्यमंत्री

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २७०० सफाई कामगारांपैकी ज्या कामगारांची नियुक्ती नावातील इंग्रजी स्पेलिंगमुळे रद्द करण्यात आली आहे, अशा कामगारांना ३ महिन्यांत सेवेत सामावून घेण्याचे तसंच त्यांच्याकडून क्षतिपूर्ती बंधपत्र (इंडेमिटी बाँड) घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

बैठकीचं आयोजन

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील २७०० सफाई कामगारांना सेवेत सामावून घेण्यात येणाऱ्या अडचणीसंदर्भात मंगळवारी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांना सेवेत सामावून घेण्यात यावं. न्यायालयाच्या यादीतील नावे व सफाई कर्मचाऱ्यांच्या पडताळणीत आढळलेल्या नावातील इंग्रजी स्पेलिंगमधील चुकासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांकडून क्षतिपूर्ती बंधपत्र (इंडेमिटी बाँड) घेण्यात यावं. तसंच ज्या कामगारांना पूर्वी नियुक्ती दिली, पण नंतर स्पेलिंगमधील चुकांमुळे नियुक्ती आदेश रद्द करण्यात आले आहेत, अशा कामगारांना प्राधान्याने नियुक्ती द्यावी.

- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


हेही वाचा-

पालिका कर्मचाऱ्यांची ३० मिनिटे सवलत रद्द ?

महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनामध्ये वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या