Advertisement

महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनामध्ये वाढ


महापालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनामध्ये वाढ
SHARES

मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना आता किमान वेतनाप्रमाणेच पगार मिळणार आहे. महापालिकेच्या सर्व कंत्राटी कामगारांना सध्या २९३ रुपये एवढे किमान वेतन देण्यात येते. परंतु आता यामध्ये वाढ झाल्याने किमान वेतनाचा दर हा ५७६ रुपये एवढा करण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी बसवण्यात येणाऱ्या पंपांच्या कंत्राट कामांमधील कामगारांना हा वाढीव किमान वेतनाचा लाभ देण्यात आला आहे.


दहा टक्के वाढीव रक्कम मिळणार

महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या वतीने पंपाचा पुरवठा व देखभाल करण्यासाठी देण्यात आलेल्या यापूर्वीच्या कंत्राटात किमान वेतन कायद्यानुसार २९३.८३ इतके किमान वेतन देण्यात आले होते. त्यामुळे या किमान वेतनात दहा टक्के वाढीव रक्कम देण्याचा विचार प्रशासनाने केला होता. परंतु किमान वेतनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे सध्या किमान वेतनाचा दर हा ५७६.९२ इतका आहे. त्यामुळे सुधारित वेतन गृहित धरूनच या पंपाचे कंत्राट देण्यात आलं आहे.


पालिकेच्या सर्व खात्यांना नियम लागू

पंप बसवण्याच्या या कंत्राटात सुधारित किमान वेतनाचा लाभ देण्यात आल्यानं महाराष्ट्र सरकारच्या परिपत्रकानुसारच किमान वेतन दिलं जाणार असेल तर हे परिपत्रक सर्वच विभागांना लागू करण्याची मागणी भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी केली होती. २३ ऑक्टोबर २०१७ चे हे परिपत्रक महापालिकेच्या सर्व खात्यांना लागू असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.


कामगार अायुक्तांकडे धाव

हे परिपत्रक पर्जन्य जलवाहिनी खात्याला लागू नाही. परंतु या खात्यात काम करणाऱ्या इतर कंत्राटी कामगारांनी कामगार आयुक्तांकडे धाव घेतली व त्यापूर्वी केलेल्या कामाचा मोबदला हा किमान वेतन कायद्यानुसार देण्याविषयी याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये कामगार आयुक्तांनी, मुंबई महापालिका ही मुख्यनियोक्ता आहे व त्यांना कंत्राटदाराने दिलेल्या पगारामध्ये व किमान वेतन कायद्यानुसार द्याव्या लागणाऱ्या रकमेतील फरक मुंबई महापालिकेने देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पर्जन्य जलविभागाने पंप चालविण्यासाठी नेमलेल्या कंत्राटदाराला किमान वेतन कायद्यानुसारच अंदाजपत्रक बनवले असल्याची माहिती पर्जन्य जलविभागाचे प्रमुख अभियंता विद्याधर खणकर यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा -

शिक्षणाच्या आयचा घो! कंत्राटी शिक्षकापेक्षा सफाई कामगाराचा पगार दुप्पट!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा