Mahajobs: महाविकास आघाडी फक्त शिवसेना-राष्ट्रवादीची? काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने विचारला प्रश्न

राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने 'महाजॉब्स' (http://mahajobs.maharashtra.gov.in) हे ऑनलाइन पोर्टल सुरू केलं आहे. या पोर्टलची जाहिरात सध्या राज्य सरकारकडून केली जात आहे. या जाहिरातीवरून काँग्रेसने पुन्हा एकदा नाराजीचा सूर लावला आहे. महाजाॅब्स ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे, की शिवसेना-राष्ट्रवादीची ? असा प्रश्न महाराष्ट्र राज्य युथ काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी विचारला आहे. (congress leaders angry over mahajobs portal ad of maharashtra government)

नेमकी भानगड काय?

राज्य सरकारकडून 'महाजॉब्स' पोर्टलची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्या जाहिरातीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक आणि राज्यमंत्री आदिती तटकरे या नेत्यांची छायाचित्रे आहेत. हे सगळे मंत्री शिवसेना किंवा राष्ट्रवादी पक्षातील आहेत. काँग्रेसच्या एकाही नेत्याचं या जाहिरातीत छायाचित्र नसल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी आहे. काँग्रेस नेते ही नाराजी उघडपणे व्यक्त देखील करू लागले आहेत.

हेही वाचा - Mahajobs: बेरोजगारांची झुंबड, अवघ्या ४ तासांत ‘महाजॉब्स’वर ‘इतक्या’ जणांची नोंदणी

तीव्र नाराजी

त्यावरून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. 'महाजॉब्स' ही योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची आहे की शिवसेना-राष्ट्रवादीची? महाविकास आघाडी होत असताना, ठरलेल्या किमान समान कार्यक्रमाची व त्यातील शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही? हा माझ्या सारख्या सामान्य काॅंग्रेस कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

तर काँग्रेस खासदार राजीव सातव यांनीही या जाहिरातीवरून शिवसेना-राष्ट्रवादीला समजूतीचा सल्ला दिला आहे. योजना चांगली आहे आणि आमचं पूर्ण सहकार्य आहेच. फक्त सरकार आघाडीचं आहे याची काळजी लोकांसमोर जाताना सर्वांनीच घ्यायला हवी. येत्या काळात या जाहिरातीत दुरुस्ती होईल अशी आशा. पुन्हा अशी चूक होणार नाही या खात्रीसोबत, असं राजीव सातव म्हणाले.

शिवसेनेकडून दिलगिरी

जाहिरातीवरून निर्माण झालेला वाद उगाच वाढू नये म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्वत: फोन करून याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. भलेही हे प्रकरण फारसं चिघळणार नाही, याची दक्षता महाविकास आघाडीतील नेते घेत असले, तरी महाविकास आघाडीत छोट्या-मोठ्या गोष्टींवरुन कुरबुरी सुरूच असल्याचं यावरून स्पष्टपणे दिसून येत आहे. 

हेही वाचा - तरूणांनो, नोकरी शोधताय? राज्य सरकारने बनवली ‘ही’ वेबसाईट

पुढील बातमी
इतर बातम्या