Advertisement

तरूणांनो, नोकरी शोधताय? राज्य सरकारने बनवली ‘ही’ वेबसाईट

राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना देण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलं आहे.

तरूणांनो, नोकरी शोधताय? राज्य सरकारने बनवली ‘ही’ वेबसाईट
SHARES

राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना देण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलं आहे. या संकेतस्थळावर गेल्यास बेरोजगार तरूणांना उपलब्ध रोजगाराची माहिती (maharashtra government starts mahaswayam job application portal for unemployed youth) मिळण्यासाेबतच उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. उद्योजक आणि त्यांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळाचा समन्वय साधून दोघांनाही उपयोगी ठरणारं हे संकेतस्थळ बनवण्यात आलं आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

रोजगारसंधींची माहिती  

बेरोजगार तरूणांनी या संकेतस्थळावर जाऊन शैक्षणिक आणि इतर माहितीसह नोंदणी केल्यावर. त्यांच्या या माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार एखादा उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना जॉब ऑफर मिळू शकते. याशिवाय नोकरी साधक (नोकरी शोध) याठिकाणी क्लिक केल्यावर रोजगार यादी, क्षेत्र, स्थान व शिक्षणानूसार रोजगार संधींची माहिती मिळेल. विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या रिक्त पदांच्या जाहिराती पाहण्यासाठी “रिक्तपदांच्या जाहिराती” (Vacancy Advertisement) या टॅबव्‍दारे माहिती मिळू शकते. 

शासकीय तसंच खासगी अधिसूचीत रिक्तपदांची माहिती, त्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करणे, राज्यभरात आयोजित होणाऱ्या रोजगार मेळाव्यांची माहिती मिळवणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात सहभागी होणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे आणि सहभाग घेणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या स्वयंरोजगारासाठी योजनांची माहिती मिळविणे व लाभ घेण्यासाठी उचित योजनेंतर्गत प्रकरण सादर करणे इ. बाबत बेरोजगार तरुणांसाठी या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध आहेत.  

हेही वाचा - नोकरी गेलीय? मनसेनं केलं ‘या’ नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन

इच्छुक उमेदवारांची माहिती

संकेतस्थळावर उद्योजकांसाठीही विविध सुविधा उपलब्ध आहेत. नोंदणी केलेल्या नोकरी इच्छुक उमेदवारांची माहिती, त्यांचे शिक्षण, कौशल्य, अनुभव, ठिकाण याप्रमाणे एकत्रितरित्या संकेतस्थळावर उपलब्ध होते. याशिवाय उद्योजक म्हणून नोंदणी करणे, नवीन प्लांट, शाखेची स्वतंत्र नोंद करणे, वेळोवेळी निर्माण होणारी रिक्‍तपदे अधिसूचित करणे, त्याअन्वये नोंदविलेल्या मागणीनुसार सिस्टीमद्वारे पुरस्कृत पात्र उमेदवारांची यादी मिळविणे, या पदांची विनामुल्य प्रसिद्धी करणे, ही यादी पीडीएफ किवा एक्सेलमध्ये डाऊनलोड करणे, मुलाखती आयोजित करणे, प्राथमिकरित्या निवडलेल्या उमेदवारांना सिस्टीमद्वारे विनामुल्य एसएमएस पाठविण्याची सुविधा, मुलाखत प्रक्रियेनंतर रुजू झालेल्या उमेदवारांचे प्लेसमेंट ऑनलाईन नोंदविणे आदी कार्यवाही करता येते. उद्योजकांना सीएनव्ही कायदा १९५९ अंतर्गत बंधनकारक असलेले त्रैमासिक मनुष्यबळ विवरणपत्रही या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येते.

‘इथं’ साधा संपर्क

संकेतस्थळावर रोजगार विषयक सर्व सेवा ह्या उद्योजक आणि उमेदवार या दोघांनाही विनामूल्य उपलब्ध आहेत. सर्वांनी www.mahaswayam.gov.in या वेबसाईटद्वारे देऊ केलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा, असं आवाहन कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे. याबाबत काही अडचणी असल्यास जिल्ह्यातील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा