विधानभवनात अवतरले छत्रपती शिवाजी महाराज

मराठा-धनगर-मुस्लिम आरक्षणावरून अधिवेशनात चांगलाच गदारोळ सुरू असतानाच गुरूवारी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवनात चक्क छत्रपती शिवाजी महाराज अवतरले. नेहमीच विविध प्रकारच्या वेशभूषा करत अागळंवेगळं आदोलन करण्याचा हातखंडा असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांनी गुरूवारी सकाळी शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत विधानभवनात प्रवेश केला नि सर्वाच्यांच नजरा त्यांच्यावर खिळल्या. मराठा आरक्षण आणि शिवस्मारक प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी गजभिये यांनी हा आगळावेगळा प्रयत्न केला होता.

संभाजी भिडेंची वेशभूषा

आंबा खाल्ल्यानं मुलगा होतो या संभाजी भिडे गुरूजींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गजभिये नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात संभाजी भिडेंच्या वेशात आले होते. त्यांच्या या वेशभूषेची चर्चा तेव्हाही चांगलीच रंगली होती. संभाजी भिडेंची वेशभूषा करून गजभिये यांनी सभागृहात प्रवेश केला होताच पण त्याचवेळी त्यांनी सोबत आंबाही आणला होता. तर मध्यंतरी संताची वेशभूषा केलेल्या गजभियेंना किर्तन करतानाही अनेकांनी पाहिलं आहे. गुरूवारी हेच गजभिये चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत विधानभवनात पहायला मिळाले.

उदासीन धोरणाचा निषेध 

मराठा आरक्षण, शेतकऱ्यांना कर्जमाफी यावर केवळ आश्वासनच मिळत असून शिवस्मारकातील महाराजाच्या पुतळ्याच्या उंचीवरूनही वाद सुरू आहे. तेव्हा सरकारच्या या प्रश्नांबाबतच्या उदासीन धोरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण महाराजांच्या वेशभूषेत आल्याचं गजभिये यांनी यावेळी सांगितलं.


हेही वाचा - 

अधिवेशनाचा तिसरा दिवसही पाण्यात

रामाच्या नावे आणखी किती निवडणुका लढवणार - उद्धव ठाकरे


पुढील बातमी
इतर बातम्या