राहुल गांधी १२ जूनला लावणार भिवंडी न्यायालयात हजेरी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी १२ जूनला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते सर्वप्रथम भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या मानहानी खटल्याच्या सुनावणीला हजर राहणार असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

कुठला खटला सुरू?

६ मार्च २०१४ च्या लोकसभेच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी महात्मा गांधींच्या हत्येसाठी आरएसएस जबाबदार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात आरएसएसचे भिवंडी शहर जिल्हा कार्यवाह राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात राहुल यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. 

या खटल्यावर न्यायालयात सुनावणी सुरू असून याआधीही राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते. त्यानुसार राहुल गांधी न्यायालयात आले होते. आता १२ जूनला सुनावणी असून राहुल गांधी याच सुनावणीसाठी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती आहे.

निवडणुकीवर चर्चा

सकाळी मुंबई एअरपोर्टवर उतरल्याबरोबर हेलिकाॅप्टरने भिवंडीकडे रवाना होणार आहेत. सुनावणी पार पडल्यानंतर दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ते मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पोहचणार आहेत. तिथे ते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. तिथं आगामी निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

गोरेगावमध्ये सभा नाही

पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर राहुल गांधी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधण्याची शक्यता आहे. दरम्यान १२ जूनला गोरेगावत राहुल गांधी यांची सभा होणार असल्याचं म्हटलं जात आहे, पण काँग्रेसमधील सूत्रांनी मात्री अशी कुठलीही सभा होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसमध्ये अजूनही शांतता

लोकसभा-विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून भाजपा आणि शिवसेनेनं आतापासूनच निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. भाजपानं युतीसाठीही जोर लावण्यास सुरूवात केली आहे. असं असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अजूनही शांतताच आहे. अशावेळी राहुल गांधींचं मुंबईत येणं आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा-

शिवसेना स्वबळावर ठाम - खा. संजय राऊत

टोपी न घालणारे देताहेत इफ्तार पार्टी- शरद पवार


पुढील बातमी
इतर बातम्या