Advertisement

शिवसेना स्वबळावर ठाम - खा. संजय राऊत


शिवसेना स्वबळावर ठाम - खा. संजय राऊत
SHARES

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा अजेंडा आम्हाला माहिती आहे. शिवसेनेनंही  आपला अजेंडा निश्चित केला आहे. आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार असून यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे व अमित शहा यांच्या भेटीबद्दल दिली.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी संध्याकाळी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेना युती होणार का अशी चर्चा रंगू लागली. यावर बोलताना २०१९ च्या निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या अजेंडावर शिवसेना ठाम असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.


२०१९ चा युतीचा प्रस्ताव

बुधवारी सायंकाळी भाजपा अध्यक्ष अमित शहा अाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच गाडीतून मातोश्रीवर दाखल झाले. यावेळी अमित शाह आणि उद्धव ठाकरे या दोघांत पावणे दोन तास चर्चा झाली.  शहा यांनी उद्धव यांच्यापुढं २०१९ चा युतीचा प्रस्ताव ठेवताना १ वर्ष असणाऱ्या सत्तेमध्ये ६० टक्के मंत्रीमंडळाचा वाटा सेनेला देण्याचा प्रस्तावही ठेवला. त्याचसोबत महसूल किंवा गृहमंत्री पद तर केंद्रात १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्री पदांची ऑफर भाजपनं दिल्याची सूत्रांची माहिती आहे . उद्धव ठाकरे यांनी विचार करून कळवू, असे यावेळी सांगितलं. अमित शाह यांनी या चर्चेनंतर आमरस आणि ब्रोकोली सुपचा आस्वाद घेतला.  


भेटीपासून दानवे,  तावडे, राऊत दूर

दोन नेत्यांच्या भेटीवेळी भाजपाचे  प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना नो एन्ट्री देण्यात आली. रावसाहेब दानवे यांनी वारंवार शिवसेनेला टार्गेट केल्यामुळं शिवसैनिकांनी विरोध केला. त्यामुळं दानवे यांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात अाले. तसेच दानवे यांनी शेतकऱ्यांविरोधात वारंवार वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं त्यांच्याबद्दल शिवसैनिकांत नाराजी होती. दानवे यांना अमित शहा यांच्यासोबत मातोश्रीवर जाण्यास शिवसैनिकांनी विरोध केल्यामुळे भाजपा कार्यकर्ते नाराज झाले.

 दानवे हे प्रदेशाध्यक्ष असल्याने पक्षप्रमुखांसोबत जाण्याचा प्रोटोकॉल असतो. मात्र, शिवसैनिकांच्या विरोधामुळं हा प्रोटोकॉल मोडावा लागला. त्यावर नाराज भाजपा कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटी दरम्यान नेहमी भाजपाला लक्ष करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनाही दूर ठेवावं असा आग्रह धरला होता. त्यामुळं त्यांनाही दूर ठेवल्याचं समजतं.


विधानपरिषद निवडणूक स्वबळावर

आगामी विधानपरिषद निवडणूका दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार असल्याची सूत्रांची माहिती अाहे. मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदार निवडणूकीत  शिवसेना - भाजपामध्ये थेट लढत होणार अाहे. त्यामुळं दोन्ही पक्ष प्रचारात एकमेकांचे लचके तोडतात की एकमेकांना गोजरण्याची भाषा वापरतात हे पाहावे लागेल.


हेही वाचा - 

अमित शहा व्यंगचित्रातून राज ठाकरेंकडून टार्गेट

शहांच्या संपर्काला उद्धव देणार का समर्थन?Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा