महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी, काँग्रेसने पाठिंबा काढावा- रामदास आठवले

महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली आहे. राज्यात काँग्रेसच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलेलं असलं, तरी काँग्रेसला कुठल्याही निर्णयप्रक्रियेत सामील करुन घेतलं जात नसल्याने पक्षात नाराजी आहे. त्यामुळे नाराज काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असा खोचक सल्ला रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेना तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू असल्याच्या बातम्या सातत्याने पुढं येत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या कुठल्याही महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसच्या मंत्र्यांना सहभागी करून घेत नसल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेसच्या नेत्यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीरपणे हे बाब उघड केली आहे. त्यातच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही भलेही काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असली, तरी धोरणात्मक निर्णय घेण्यास असमर्थ असल्याचं वक्तव्य केलं होतं. राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चाही झाली होती.  

हेही वाचा - काँग्रेस हट्टाला पेटली, हव्यात विधान परिषदेच्या ‘इतक्या’ जागा

त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त १२ जागांसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमध्ये खेचाखेची सुरू झाली आहे.यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसला विधान परिषदेच्या ४ जागा मिळाल्या पाहिजेत, अशी काँग्रेसची मागणी आहे. परंतु शिवसेनेला ५ जागा, राष्ट्रवादीला ४ जागा आणि काँग्रेसला ३ जागा असा प्रस्ताव काँग्रेसकडे पाठवण्यात आल्याने काँग्रेसचे सगळेच नेते नाराज आहेत.  

यावर भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले की, महाराष्ट्रात तिघाडी सरकारमध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे.मात्र काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी काँग्रेसने व्यक्त केली आहे.काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसेल तर त्यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढावा, असा सल्ला आठवले यांनी दिला आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात काँग्रेस डिसिजन मेकर नाही- राहुल गांधी
पुढील बातमी
इतर बातम्या