Advertisement

काँग्रेस हट्टाला पेटली, हव्यात विधान परिषदेच्या ‘इतक्या’ जागा

समान जागा वाटपाच्या फाॅर्म्युल्यानुसार शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा तिन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी ४ जागा आल्या पाहिजेत, अशी काँग्रेसची मागणी आहे.

काँग्रेस हट्टाला पेटली, हव्यात विधान परिषदेच्या ‘इतक्या’ जागा
SHARES

महाराष्ट्र विधान परिषदेच्या रिक्त १२ जागांसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमध्ये आता खेचाखेची सुरू झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्हीपैकी एकही पक्ष मागे (congress wants equal seats of maharashtra legislative council  ) हटायला तयार नाही. खासकरून काँग्रेसची नाराजी आणखीनच उफाळून वर आल्याने परिस्थिती आणखीनच चिघळू लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून होत आहे. 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १२ जागा या महिनाअखेरपर्यंत रिक्त होत आहेत. यापैकी ८ जागा ६ जून रोजी रिक्त झाल्या आहेत. तर उरलेल्या ४ जागा अनुक्रमे १५ आणि १६ जून रोजी रिक्त होत आहेत. या १२ जागांवरील उमेदवारांची निवड राज्यपालांकडून करण्यात येणार आहेत. त्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीला आपापल्या सदस्यांची नावे सुचवायची आहेत. या जागांसाठीच सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये खेचाखेची सुरू आहेत. दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढं ढकलण्यात आलं आहे.

हेही वाचा - राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून आमदारकीची आॅफर

यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व अन्य काँग्रेस नेतेही उपस्थित होते. या बैठकीत विधान परिषदेच्या काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या जागा आणि निर्णय प्रक्रियेत काँग्रेसकडे होणारं दुर्लक्ष या दोन महत्त्वांच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आपली उघड नाराजी दर्शवली.

याबाबत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितलं की, महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विधान परिषदेच्या जागा समान वाटून घेण्यावर एकमत झालं होतं. परंतु आता शिवसेनेला ५ जागा, राष्ट्रवादीला ४ जागा आणि काँग्रेसला ३ जागा असा प्रस्ताव काँग्रेसकडे पाठवण्यात आला आहे. यावर काँग्रेसचे सगळेच नेते नाराज आहेत. समान जागा वाटपाच्या फाॅर्म्युल्यानुसार शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस अशा तिन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी ४ जागा आल्या पाहिजेत, अशी आमची मागणी आहे.

शिवाय सरकारच्या कुठल्याही निर्णयप्रक्रियेत काँग्रेसच्या मंत्र्यांना विचारात घेतलं जात नसल्याचं म्हणणंही कायम आहे. कुठल्याही निर्णय प्रक्रियेत किंवा निधी वाटपात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून झुकतं माप दिलं जात असल्याची काँग्रेस मंत्र्यांची भावना आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यावर विचारविनिमय करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्याची मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. 

हेही वाचा - विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढं ढकललं, मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा