एअरलिफ्टची परवानगी नाकारली, अशोक चव्हाण अॅम्ब्युलन्सने निघाले मुंबईला

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना एअरलिफ्ट करून नांदेडवरून विमानाने मुंबईला आणण्याची विनंती प्रशासनाने फेटाळून लावली. यामुळे अखेर अशोक चव्हाण यांना रस्तेमार्गाने ५७३ किमीचा प्रवास करत अॅम्ब्युलन्सने मुंबईला यावं लागलं आहे. 

दोन टेस्ट निगेटिव्ह

विधान परिषद निवडणुकीसाठी मुंबईला आलेले अशोक चव्हाण हे दोन दिवसांपूर्वीच नांदेड या त्यांच्या मतदारसंघात परतले होते. लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने लोकांमध्ये वावरावं लागत असल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून चव्हाण यांनी मुंबईत दोनदा कोरोनाच्या चाचण्या करून घेतल्या होत्या. या दोन्ही चाचण्या निगेटीव्ह आल्या होत्या.

हेही वाचा - धक्कादायक! महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांना कोरोनाची लागण 

परंतु नांदेडला परतल्यावर त्यांनी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करून घेतली, मात्र ही चाचणी पाॅझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करून घेतलं. त्यांना कोरोनाची कुठलीही लक्षणं जाणवत नसल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं. या दरम्यान वैद्यकीय गुंतागुंत वाढायला नको म्हणून त्यांनी आणि कुटुंबीयांनी मुंबईतील रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

नियमावर बोट

ही माहिती अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनीही चव्हाण यांना विमानाने नांदेडहून मुंबईला आणण्यासंबंधीचे निर्देश दिले. परंतु कोरोनाच्या रुग्णाला विमानाद्वारे हलवता येणार नाही, असा नियम प्रशासनाने सांगत चव्हाण यांना एअरलिफ्ट करण्यास नकार दिला. त्यामुळे नाईलाजाने चव्हाण यांना अॅम्ब्युलन्समधून रस्तेमार्गाने मुंबईला निघावं लागलं.  

हेही वाचा - कोरोना पॅकेज टीव्ही सिरियल आहे का? रोज पत्रकार परिषदा कशासाठी??- अशोक चव्हाण

पुढील बातमी
इतर बातम्या