मृतदेहांशेजारी रुग्णांवर उपचार, हाच का तुमचा सायन पॅटर्न?- आशिष शेलार

सायन रुग्णालयात मृतदेहांशेजारी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार होत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून भाजप नेत्यांकडून राज्य सरकारला या प्रकरणावरुन धारेवर धरलं जात आहे. मुंबई महापालिकेच्या, सरकारच्या संवेदना मृत झाल्या आहेत का? हाच का तुमचा गरिबांना मारण्याचा...गरिबांची क्रूर चेष्टा करण्याचा... हाच का तो तुमचा ‘सायन पॅटर्न’? असा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी विचारला आहे. 

व्हिडिओ व्हायरल

सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातील एका वाॅर्डात जागोजागी खाटांवर ठेवलेले असताना या मृतदेहाच्या बाजूला रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकला होता. हा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होताच, चोहोबाजूंनी सरकारवर टीका व्हायला लागली. 

हेही वाचा- 'या' रुग्णालयात मृतदेहांच्या शेजारीच रुग्णांवर उपचार

गरिबांची क्रूर चेष्टा

यावर बोलताना आशिष शेलार म्हणाले, सायनच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांवर उपचार सुरु... मुंबई महापालिकेच्या, सरकारच्या संवेदना मृत झाल्या आहेत का? जगासमोर हाच तुमचा पॅटर्न नेणार का ? मुख्यमंत्री, पालकमंत्री, महोदय, गरिबांची एवढी क्रूर चेष्टा का करताय ?

ICMR च्या गाईडलाईनला हरताळ फासलात??? केंद्रीय पथकाने मुंबईत येऊन जी भीती व्यक्त केली होती त्यावरुन राजकारण केलंत. शेवटी काय झालं महापालिकेचं पितळ उघडं पडलंच ना! थांबवा तुमचं हे राजकारण... गरिबांचा जीव घेऊ नका... गरिबांना कोरोनाच्या जबड्यात घालायचं पाप करु नका!

मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का?

तर, सायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे. प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे ही अत्यंत गंभीर बाब आहे. मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने तात्काळ लक्ष घालावं. अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असं राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा- धारावीसाठी पालिकेचा 'असा' आहे अॅक्शन प्लान
पुढील बातमी
इतर बातम्या