महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन? पण केंद्रानंतरच घोषणेची शक्यता

देशाचे पंतप्राधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी जनतेला संबोधून केलेल्या भाषणात पुढील लाॅकडाऊनची घोषणा १७ मे च्या आधी केलं जाईल, असं स्पष्ट केलेलं असताना महाराष्ट्रातही लाॅकडाऊन (lockdown in maharashtra) ३१ मे पर्यंत कायम राहील, अशी शक्यता दिसून येत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत राज्यातील लाॅकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात यावं, असं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कुठं झाली बैठक?

मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत गुरूवार १४ मे रोजी दुपारी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसंच वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारीदेखील उपस्थित होते.

महाराष्ट्रातील स्थिती

या बैठकीत कोरोनासंदर्भातील (coronavirus) उपायोजनांसोबतच लाॅकडाऊनच्या कालावधीवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. इतर राज्यांच्या तुलनेत देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे महाराष्ट्रातच आढळून आले आहेत. मुंबईची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. कोरोनाला आळा घालण्यात प्रशासनाला अजूनही यश आलेलं नाही. परिणामी चर्चेत उपस्थित सर्व नेत्यांनी ३१ मे पर्यंत लाॅकडाऊन वाढवण्यात यावं, असं मत नोंदवलं.   

हेही वाचा - विधान परिषद निवडणूक: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिनविरोध बनले आमदार

उद्योगांना सवलत

लाॅकडाऊन वाढवण्यात येत असलं, तरी त्यातून उद्योगधंद्यांना काही प्रमाणात सवलती देण्यात याव्यात जेणेकरून आर्थचक्र सुरळीत होण्यास हातभार लागू शकेल. तूर्तास रेड झोन, कंटेन्मेंट झोनमध्ये कोणतीही सवलत देण्याची आवश्यकता नाही, असंही मत उपस्थित सर्वांनी नोंदवल्याचं कळत आहे.  

अटी कळाल्यावरच

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना १७ मे नंतरही लॉकडाऊन वाढवण्यात येईल असं सांगितलं होतं. या लाॅकडाऊनचा कालावधी नेमका कधीपर्यंत असेल, हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं आहे. केवळ १७ मे च्या आधी लाॅकडाऊनची माहिती देण्यात येईल तसंच या टप्प्यातील लाॅकडाऊनसाठी वेगळे नियम आणि अटीशर्थी असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.  

त्यामुळे भलेही महाराष्ट्रातही देखील लाॅकडाऊन वाढवण्यात येणार असलं, तरी त्याबाबतची अधिकृत घोषणा ही १७ मे नंतरच करण्यात येईल. त्याचसोबत केंद्राच्या अटीशर्थींनंतरच महाराष्ट्रातील लाॅकडाऊनबाबतचं धोरण ठरवण्यात येईल, असंही म्हटलं जात आहे. 

हेही वाचा - मुंबईसाठी वेगळं आर्थिक पॅकेज द्या, शिवसेना खासदार संजय राऊत यांची केंद्र सरकारकडे मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या