महाराष्ट्रातील लाॅकडाऊन ३० एप्रिलपर्यंत? मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे काय केली मागणी

कोरोनाचा (coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेला २१ दिवसांचा लाॅकडाऊन येत्या १४ एप्रिलला संपत आहे. परंतु अजूनही कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने हे लाॅकडाऊन (lockdown) ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात यावं, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लाॅकडाऊन पुढचे काही दिवस तरी सुरूच राहण्याची दाट शक्यता आहे. 

देशात लाॅकडाऊन जाहीर हाेण्याआधीच उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी महाराष्ट्रात लाॅकडाऊन लागू केलं होतं. तरीही सद्यस्थितीत महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची (covid-19) संख्या वाढून १६६६ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्याही हजारच्या पलिकडे जाऊन पोहोचली आहे. तर देशातही कोरोना नियंत्रणात नाही. देशातील कोरोनाबाधितांची संख्या ७४४७ वर पोहोचली आहे. यामध्ये २३९ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर ६४३ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलीय. तरीही कोरोनाग्रस्तांची जलदगतीने होणारी वाढ सर्वांनाच चिंतेत टाकणारी ठरत आहे. 

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी शनिवार ११ एप्रिल रोजी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ काॅन्फरन्सिगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येक राज्यातील कोरोनाबाबतची स्थिती जाणून घेतली. लाॅकडाऊन संपण्यासाठी ३ दिवसच शिल्लक असल्याने लाॅकडाऊन वाढवण्यात यावा की नाही? याबद्दलची मतंही जाणून घेतली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लाॅकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याची मागणी पंतप्रधानांकडे केल्याचं समजत आहे.

दिल्लीतील परिस्थिती देखील आटोक्यात नसल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील लाॅकडाऊनचा कालावधी कमीतकमी ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात यावा असं मत नोंदवलं आहे. दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या आता हजारच्या जवळपास पोहोचली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तर आधीच लाॅकडाऊन १ मे पर्यंत सुरू राहील, असं घोषित करून टाकलं आहे. याचपद्धतीने अनेक राज्यांनी लाॅकडाऊन वाढवण्याची मागणी केली आहे. 

याकडे पाहता पंतप्रधानांकडून ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन वाढवण्याची घोषणा होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 


हेही वाचा-

वाधवान प्रकरणावर मुख्यमंत्री गप्प का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

Coronavirus Updates: चिंताजनकi मुंबईत दिवसभरात वाढले २१८ कोरोनाबाधित रुग्ण


पुढील बातमी
इतर बातम्या