सव्वा दोन लाख परप्रांतीय-मजुरांच्या जेवणाची व्यवस्था केलीय- मुख्यमंत्री

लाॅकडाऊनमुळे (lockdown) उद्योगधंदे बंद झाल्याने हातावर पोट असलेले परप्रांती मजूर आणि कामगारांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तो प्रश्न राज्य सरकारने सोडवला असून सरासरी २ ते सव्वा दोन लाख मजुरांच्या (labour)जेवणाची व्यवस्था केल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) यांनी दिली. राज्यातील जनतेशी सोशल मीडियावरून संवाद साधत असताना त्यांनी ही माहिती दिली. 

सीमा बंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, न्यूज चॅनेलमध्ये असं चित्र दिसतंय की हजारो, लाखो मजूर मिळेल त्या साधनाने आपापल्या मूळ गावी, घरी आणि परराज्यात निघाल्याचं पाहायला मिळत आहे. माझं त्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही आहात तिथंच थांबा. कारण लाॅकडाऊनमुळे जिल्ह्याच्याच नाही, तर राज्यांच्या सीमा देखील बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांनी कुठेही जायची गरज नाही. त्यांच्या देखभालीची व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. 

हेही वाचा - वेतन कपात नव्हे, वेतन २ टप्प्यांत, अजित पवार यांचा खुलासा

जेवणाची व्यवस्था

किमान २ ते सव्वा दोन लाख मजुरांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात ठिकठिकाणी १ हजार केंद्र सुरू केली आहेत. त्यामुळे कुणाकडे कार्ड असो किंवा नसो प्रत्येकाला तिथं अन्न मिळेल. फक्त जेवण करून पुन्हा आपल्या गावाकडे निघू नका. कारण झुंडीच्या झुंडी रस्त्यावर उतरल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदतच होईल, हेच आपल्याला टाळायचं आहे. शिवभोजन थाळींची संख्या १ लाखांवर नेण्यास मंजुरी देण्यात आली आहे. १० रुपयांची शिवभोजन थाळी ५ रुपयांना करण्यात आली आहे. फक्त तिथं गर्दी होता कामा नये. 

आहात तिथेच राहा

इतर राज्यातील मुख्यमंत्री संपर्क साधून त्यांच्या राज्यातील मजुरांची काळजी घेण्याची विनंती आपल्याला करत आहेत. महाराष्ट्रात राहणारे जितके पण मजूर आहेत, त्यांची मानवतेच्या दृष्टीकोनातून काळजी घेण्यात येत आहे, असं आपण त्यांना आश्वस्त करत आहोत. त्याचप्रमाणे इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील जनतेलाही माझं हेच सांगणं आहे की आहात तिथेच राहा, तुमची देखील काळजी घेण्यात येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - कोरोना विरुद्ध लढ्यासाठी माझा महिन्याचा नाही वर्षाचा पगार घ्या - जितेंद्र आव्हाड

पुढील बातमी
इतर बातम्या