राज्य सरकारने आपल्या आदेशातील त्रूटी त्वरित दूर करून प्रत्येक गरजूला धान्य मिळेल, हे सुनिश्चित करावे, अशी विनंती विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी भाजपाचे राज्यातील सर्व खासदार, आमदार, जिल्हा अध्यक्ष आणि विधानसभा मतदारसंघांचे प्रभारी यांच्याशी टेलिकाॅन्फरन्सिगच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विनोद तावडे तसंच इतर नेते या संवादात सहभागी झाले होते. या वेळी केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या धान्य वाटपातील त्रुटींवर चर्चा करण्यात आली.
हेही वाचा - लाॅकडाऊनमध्ये पाडणार 'हा' १८७ वर्षे जुना ऐतिहासिक पूल
जाचक अटी
केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरातील सर्वसामान्यांना पुढील ३ महिन्यांचं धान्य रेशन दुकानामार्फत देण्यात येणार आहे. हे धान्य देताना केंद्र सरकारने कोणतीही अट ठेवलेली नाही. मात्र राज्य सरकारने अनेक अटी टाकल्या आहेत. आधी विकत मिळणारं रेशन घेतल्यानंतर पुढचं धान्य मोफत मिळेल, ज्यांनी नियमित धान्य घेतलं, त्यांनाच ते मिळेल, अशा स्वरूपाच्या या अटी आहेत.
९० टक्के धान्य उपलब्ध
माझी राज्य सरकारला नम्र विनंती आहे की त्यांनी या अटी मागे घ्याव्यात. आज गरिबांना धान्य मोफत मिळणं अतिशय आवश्यक आहे. रेशन कार्ड असो वा नसो, धान्य देण्याचे निर्णय अन्य राज्यांनी सुद्धा घेतले आहेत. केंद्रीय नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवेजी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, ३ महिन्यांसाठी आवश्यक धान्यापैकी ९० टक्के कोटा उपलब्ध झाला आहे. उर्वरित २ दिवसांत उर्वरित धान्य उपलब्ध होईल. त्यामुळे ३ महिन्यांचं धान्य राज्य सरकारने एकत्र द्यावे, अशी विनंती फडणवीस यांनी राज्य सरकारला केली आहे.
हेही वाचा - ‘त्यांना’ दिव्याचा अर्थ कळलाच नाही, राम कदम यांचा टोमणा