‘त्यांना’ दिव्याचा अर्थ कळलाच नाही, राम कदम यांचा टोमणा

भाजपचे आमदार राम कदम (bjp mla ram kadam) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करून या टीकेला प्रतिउत्तर दिलं आहे. टीका करणाऱ्यांना दिव्याचं महत्त्वच कळलेलं नाही, अशा शब्दांत कदम यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

‘त्यांना’ दिव्याचा अर्थ कळलाच नाही, राम कदम यांचा टोमणा
SHARES

पंतप्रधान नरेंद्र माेदी (pm narendra modi) यांनी रविवारी रात्री ९ वाजता संपूर्ण देशातील जनतेला दीपप्रज्वलन करून एकजुटता दाखवण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका करण्यात आल्यानंतर भाजपचे आमदार राम कदम (bjp mla ram kadam) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करून या टीकेला प्रतिउत्तर दिलं आहे. टीका करणाऱ्यांना दिव्याचं महत्त्वच कळलेलं नाही, अशा शब्दांत कदम यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे.

देशातील सर्वजण मिळून कोरोनाच्या (coronavirus) संकटाशी मुकाबला करत आहेत. या अंधकारातून मार्ग काढताना एक आशेचा किरण म्हणून प्रत्येकानं प्रकाशाचा दिवा हाती घेऊन एकतेचा संदेश द्यावा, असा पंतप्रधान मोदींच्या आवाहनामागचा अर्थ आहे. परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना तिमिरातून तेजाकडं नेणाऱ्या या दिव्याचं महत्त्वं कळलेलं नाही, असा खेद राम कदम यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - सोचा था चूल्हा जलाने की बात होगी, साहब दिया जलाने का उपदेश दे गये - नवाब मलिक

 

'या संकटाच्या काळात आम्ही कोणावरही आरोप करणार नाही. पण, मोदींनी महाराष्ट्रातील गोरगरिबांना मोफत धान्य दिलं. त्यातलं एक किलोही धान्य अजून महाराष्ट्रातील गोरगरिबांपर्यंत पोहोचलेलं नाही. राज्यातील दवाखाने बंद आहेत. तिथल्या डॉक्टरांना किट द्यायलाही राज्य सरकार तयार नाही. डॉक्टरांना काळ्या बाजारातून २२०० रुपये मोजून हँडग्लोव्हज विकत घ्यावे लागताहेत. राज्यातील नेत्यांनी व मंत्र्यांनी इतर गोष्टींवर भाष्य करण्याऐवजी याकडं लक्ष द्यायला हवं. महाराष्ट्रातील लोक उपासमारीनं मरताहेत तिकडं लक्ष देण्याची गरज आहे,' अशी अपेक्षाही राम कदम यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (nawab malik) यांनी पंतप्रधान चूल पेटवण्यासंबंधी काहीतरी बोलतील असं वाटलं होतं, पण ते तर दिवे लावण्याचा उपदेश देऊन गेले, अशा शब्दांत टीका केली होती. तर, थाळी-टाळीनंतर आता देशात दिवे लावण्याचा कार्यक्रम सादर होत आहे. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशाला इव्हेंटची नव्हे, तर रुग्णालयं, व्हेंटिलेटर, चाचणी लॅबची गरज आहे. हातावर पोट असलेले मजूर व कामगारांना दोन वेळचं जेवण हवं आहे. त्यामुळं हे प्रसिद्धी स्टंट बंद करून पंतप्रधानांनी काहीतरी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) म्हणाले होते.

संबंधित विषय