भाजपने सोनू सूदला प्यादं म्हणून वापरलं? संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

कोरोना काळात ‘भाजप’ अस्तित्वासाठी झगडत होता. ठाकरे सरकारवर सतत करत असलेल्या टीकेमुळे भाजप लोकांच्या मनातून उतरला. मजुरांच्या पायपिटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादं म्हणून वापरलं काय? असा प्रश्न विचारत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि सोनू सूद याच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातील लेखात संजय राऊत यांनी सोनू सूद याच्या मदतकार्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात ते म्हणतात की, सोनू सूदचा चेहरा पुढं करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करीत होते. सोनू सूद हा ‘महाबली’, ‘बाहुबली’ किंवा ‘सुपरहीरो’ आहे असे चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतलं (हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) व त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. 

सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना ‘घरपोच’ पाठवण्याची व्यवस्था करू शकतो? या सर्व यंत्रणेचा कर्ताधर्ता शंकर पवार आहे. ते राष्ट्रीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. तर हा फक्त एक चेहरा आहे. गर्दीतल्या सोनूच्या मागे शंकर पवार उभं असल्याचं अनेक छायाचित्रांत दिसत आहे. सोनू सूदला महाराष्ट्राच्या राज्यपालांनी राजभवनावर खास बोलावून घेतलं व तो करत असलेल्या मदतकार्याची माहिती घेतली. सोनू सूद राजभवनात जाऊन राज्यपालांना भेटला व स्थलांतरित मजुरांची वेदना मांडली. त्यावर राज्यपालही भावनाविवश झाले. 

हेही वाचा- मुंबईहून बिहारला गेलेल्या गरोदर महिलेला झाला मुलगा, नाव ठेवलं सोनू सूद

त्यांनी पुढं नमूद केलं की, मी असं वाचले की, सोनू रोज मुंबईत फसलेल्या एक हजार बाराशे मजुरांना त्यांच्या घरी बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, बंगाल, मध्य प्रदेशात बसने पोहोचवत होता. त्यापैकी प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी मजुरांना इतक्यात पाठवू नका असं बजावलं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज कोरोनामुक्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याशिवाय कुणालाही आपल्या राज्यात घ्यायला तयार नव्हते. मग हे मजूर नक्की पोहोचले कुठं? लॉक डाऊन काळात इतक्या बसेसची नियमबाह्य व्यवस्था झाली कशी? सोनू सूद जणू एक समांतर सरकार चालवत होता व त्याला हवं ते सर्व मिळत होतं.

सोनू सूद हा एक उत्तम अभिनेता आहेच. त्याच्या मनात सामाजिक कार्याची तळमळ असेलही. त्याने रस्त्यावर उतरून जे काम केले, भले ते ‘प्रायोजित’ असेल, पण देशभरातील लोकांनी ते पाहिलं. इतर अनेक अभिनेते, क्रिकेटपटूंनीही, मग ते सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर वगैरे असतील, या सगळ्यांनी कोरोना काळात कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. महाराष्ट्रात अनेकांनी आपल्या ‘पेन्शन’च्या रकमा, पगाराचे धनादेश या कार्यासाठी जमा केले. लहान मुलांनी वाढदिवसाचा ‘खर्च’ टाळून ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली. याच पैशातून लाखो मजुरांच्या राहण्या-खाण्याची, पुढच्या प्रवासाची व्यवस्था झाली. त्यापैकी अनेकांचे ‘दान’ गुप्तच राहिले. कारण हे सर्व लोक प्रायोजित नव्हते. सोनू सूद पडद्यावर आणि रस्त्यावरही उत्तम अभिनय करतो. कारण पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक तितकेच कसलेले होते,असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपकडे बोट रोखलं आहे.

हेही वाचा- सोनू सूद गुगल ट्रेंडमध्ये अव्वल

पुढील बातमी
इतर बातम्या