Coronavirus Update: लष्कराला बोलवायला लावू नका, उपमुख्यमंत्र्यांचा बेजबाबदारांना इशारा

कोरोना व्हायरस (Coronavirus update) पसरून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणूनच देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यावेळी लोकांनीसुद्धा वेळेचं गांभीर्य ओळखून तसंच वर्तन ठेवलं पाहिजे, स्वयंशिस्त पाळली पाहिजे. अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना बिलकूल सहन केल्या जाणार नाहीत. लाॅकडाऊनची (lockdown) परिस्थिती हाताळण्यासाठी अमेरिकेत लष्कराची (military) मदत घेण्यात आली आहे. राज्यात लष्कराला बोलवण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा गुरूवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy cm ajit pawar) यांनी बेजबाबदार लोकांना उद्देशून दिला. 

वस्तूंचा पुरवठा होणार

राज्यात २१ दिवसांसाठी संचारबंदी (curfew) असली तरी, जनतेला दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्य, स्वयंपाकाचा गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येत आहे. तरीही बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वराज संस्थांनी जीवनावश्यक वस्तू घरपोच किंवा सोसायटी परिसरात उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावं.  स्वयंसेवी संस्था, समाजाने पुढं येऊन शहरात एकाकी राहत असलेले ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, रस्त्यावर राहणारे गरीब, बेघर यांच्या भोजनाची सोय करावी, असं आवाहन पवार यांनी केलं. 

हेही वाचा - लोकांना देणार धान्याऐवजी थेट पीठ, महसूलमंत्र्यांची माहिती

गांभीर्य ओळखा

प्रवासबंदी असतानाही काही जणांनी दूधाच्या टँकरमध्ये बसून प्रवास केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. वसईत पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं. बीडमध्येही पोलिसांवर हल्ला करण्यात आला. मालेगावात लोकप्रतिनिधींकडूनच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या गोष्टी चिंताजनक आहे. जनतेनं परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वर्तन ठेवावं. 

कारवाई करणार

कोरोना संकटाच्या काळात कर्तव्य बजावणारे पोलीस, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत. हल्ले करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन कायद्यानुसार कारवाई केली जाईल. कोरोनाशी लढा देण्यासाठी पोलीस आणि नागरिक दोघांनीही स्वयंशिस्त, संयम पाळावा, असं पवार म्हणाले.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या पत्रकाराला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्याने लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी सावधगिरी बाळगून आॅनलाइन संवाद साधण्याचं आवाहनही पवार यांनी केलं. 

हेही वाचा - Coronavirus Updates: 'त्या' देवदूतांच्या मदतीला धावला 'सिद्धिविनायक'

पुढील बातमी
इतर बातम्या