गरीबांना आता फक्त ५ रुपयांत शिवभोजन!

कोरोनाच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शिवभोजन थाळी (shiv bhojan thali) प्रकल्पाचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात येत असून राज्यात दररोज सकाळी ११ ते ३ या वेळेत १ लाख शिवभोजन थाळीचं वितरण करण्याचा अन्न, नागरी पुरवठा विभागाने महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी दिली. या निर्णयामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत भुकेलेल्या आणि गरजूंना मोठा दिलासा मिळेल.

थाळींच्या संख्येत पाचपट वाढ

कोरोना विषाणूच्या (covid-19) प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ ५ रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय घेतला आहे.या योजनेचा तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी ४५ रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी ३० रुपये शासन देणार आहे. यासाठी शासनाने १६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्याने कुणाचीही उपासमार होऊ नये या उद्देशाने हा  सवलतीचा ५ रुपये दर जूनपर्यंत लागू राहणार आहे.

तालुकास्तरावर विस्तार

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कष्टकरी,असंघटित कामगार,स्थलांतरित,बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा विस्तार करण्यात येत असून तालुकास्तरावर शिवभोजन केंद्र सुरू करण्यासाठी १ एप्रिलपर्यंत विलंब न करता जिल्हाधिकारी आणि नियंत्रक शिधावाटप यांनी आपल्या जिल्ह्यात क्षेत्रात तातडीने शिवभोजन केंद्र सुरू होण्यासाठी नव्याने शिव भोजनालय सुरू करावीत असे आदेश देण्यात आले आहे.त्याचबरोबर शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी ११  ते ३ या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा - कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या, मुंबईत २ हजार आयसोलेशन बेड सज्ज!

व्यापक प्रसिद्धी

या निर्णयानुसार कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे जे लोक स्वतःच्या जेवणाची सोय करू शकत नाही त्यांना शिव भोजनाचा लाभ घेण्यासाठी व्यापक प्रसिद्धी देण्यात येऊन यासाठी जिल्ह्यातील प्रशासकीय तसंच पोलिस यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. तसंच कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावरील बेघर,स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी उपाशी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.

स्वच्छता राखा, अंतर ठेवा

शिवभोजन चालकांनी ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून देणं तसंच भोजनालय दररोज निर्जंतुक करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.भोजनालय चालकांनी ग्राहकांना शक्यतो पॅकिंग स्वरूपात जेवण उपलब्ध करून देणं, जेवण तयार करण्याआधी हात कमीत कमी २० सेकंद साबणाने स्वच्छ करणं, शिवभोजनाची सर्व भांडी निर्जंतुक करून घेणं, भोजन तयार करणाऱ्या तसंच वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणं, भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणं त्याचबरोबर भोजनालय चालकाने प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीतकमी ३ फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना करण्यात आलेल्या आहे. 

हेही वाचा - उगाच पुढारपणं कशाला करता?, गप्प घरातच बसा- जयंत पाटील

पुढील बातमी
इतर बातम्या