कर्नाटकात शिवसेनेवर नामुष्की, सर्व उमेदवारांचं डिपाॅझिट जप्त

कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर सत्तास्थापनेचं रंगलेलं नाट्य ऐन भरात आहे. भाजपा आणि काँग्रेसच्या एकमेकांविरोधात कुरघोड्या सुरू असून सत्तास्थापनेसाठी घोडेबाजाराला उधाण आल्याच्या चर्चा आहेत. असं असताना महाराष्ट्रातील मोठा प्रादेशिक पक्ष अशी ओळख असलेल्या शिवसेनेला कानडी मतदारांना चांगलाच दणका दिल्याची आकडेवारी पुढं आली आहे. कर्नाटकात शिवसेनेच्या एकाही उमेदवाराला निवडून तर येता आलं नाहीच, पण सर्वच्या सर्व उमेदवारांना आपलं डिपाॅझिटही गमवावं लागलं आहे.

किती उमेदवार होते?

शिवसेनेनं राज्याबाहेर आपली पाळंमुळं रोजवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच आधी गोवा त्यानंतर उत्तर प्रदेशाच्या निवडणूक रिंगणात शिवसेनेनं उडी घेतली होती. तर नुकत्याच पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं ३७ उमेदवार उभे केले होते. मराठी भाषिक, सीमाप्रश्नावर नेहमीच शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे उत्तर कर्नाटकात मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा करत शिवसेनेनं आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते.

उमेदवारांकडून निराशा

पण, या निवडणुकीत शिवसेनेसह आप आणि जेडीयूचा कानडी जनतेनं पार धुव्वा उडवला. या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांचं डिपाॅझिट जप्त झालं. आपच्या २९, जेडीयूच्या २८ तर १११४ अपक्ष उमेदवारांचं डिपाॅझिट जप्त झालं. शिवसेनेच्या ३७ पैकी ३७ उमेदवाराचं डिपाॅझिट जप्त झाल्यानं शिवसेनेच्या उमेदवारांना कानडी जनतेनं एक षष्ठांशही मत दिली नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

या निवडणुकीत भाजपा (१०४) पहिल्या क्रमांकाचा, काँग्रेस (७८) दुसऱ्या तर जेडीएस (३७) तिसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरला आहे.


हेही वाचा-

'मग बॅलेट पेपरने निवडणुका घेऊन दाखवा' - उद्धव ठाकरे

'मग लोकशाहीची हत्या कशी?' - संजय राऊत


पुढील बातमी
इतर बातम्या