शेजाऱ्याच्या घरी मुलगा झाल्यावर पेढे वाटू नये- देवेंद्र फडणवीस

विदर्भापासून भाजपच्या पराभवाची सुरुवात झाल्याचं म्हणत भाजपवर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ‘शेजाऱ्याच्या घरी मुलगा झाला, म्हणून पेढे वाटू नये,’ असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

हेही वाचा- सत्तेचं टाॅनिक संपल्याने भाजपची ‘सूज’ उतरली, सामनातून भाजपवर टीका

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला खाली खेचत ठिकठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या घरात नागपूरमध्ये पक्षाला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. येथील ५८ पैकी ४० जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. दिग्गज नेते तसंच पक्षाचं वर्चस्व असलेल्या नागपूरमध्ये भाजपचा पराभव झाला आहे. भाजपच्या पराभवाची सुरूवात विदर्भातून झाल्याची प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.  

त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपची  कामगिरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा चांगली झाली असून भाजप या निवडणुकीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचा दावा त्यांनी केला. पण निकालानंतर गुरुवारी प्रदेश कार्यालयात वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र सुरू होतं. मात्र निकालांचा या बैठकांशी संबंध नसून संघटनात्मक तयारी व पक्षांतर्गत निवडणुकांसाठी या बैठका असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा- गुपचूप काही केलं तर वाईटच घडतं, ‘राज’भेटीवरून नवाब मलिक यांचा फडणवीसांना टोला

 

पुढील बातमी
इतर बातम्या