मुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांशी तुम्ही बोलू नका- मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे

आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेत, मुख्यमंत्री सेनचा की भाजपचा यावरून दोन्ही पक्षाचे नेते वेगवेगळे विधान करत असल्यानं दोन्ही पक्षातील मतभेद समोर आले आहेत. त्यामुळं दोन्ही पक्षातील नेत्यांचा मनोमीलन व्हावं यासाठी भाजप-शिवसेना आमदारांची संयुक्त बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान, 'शिवसेना-भाजप युतीबाबत सगळे ठरलं आहे. माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांवर जाऊ नका, मुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांशी तुम्ही बोलू नका’, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

'आम्ही एक आहोत'

'आम्ही एक आहोत आणि युतीही घट्ट असून, विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणंच सामोरं जाऊ’, अशी ग्वाही फडणवीस आणि ठाकरे यांनी या बैठकीत दिली. तसंच, 'भाजपचे अध्यक्ष अमित शहा, मी व मुख्यमंत्री यांचं युतीबाबत सगळं ठरलं आहे. कुणाला काहीही बोलू द्या, युती पक्की आहे. दोन्ही पक्षांचे नेते-कार्यकर्ते लोकसभा निवडणूक एकदिलानं लढले तीच एकी विधानसभा निवडणुकीतही दाखवायची आहे’, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दोन्ही पक्षांचं मनोमीलन

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दोन्ही पक्षांचं मनोमीलन सर्वांनीच अनुभवलं आहे. त्याचा मोठा फायदाही झाला. चालू अधिवेशनातही आम्ही एकत्रित आहोत. विरोधक फारच नाऊमेद आहेत पण बेसावध राहू नका, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.


हेही वाचा -

शिवसेनेच्या आ. नीलम गोऱ्हे बनल्या विधान परिषदेतील पहिल्या महिला उपसभापती

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: न्यायालयानं तिन्ही महिला डॉक्टारांचा जामीन अर्ज फेटाळला


पुढील बातमी
इतर बातम्या