अमोल कोल्हेंच्या हातावर आता घड्याळ्याची टिकटिक

प्रसिद्ध अभिनेते आणि शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी शिवबंधन तोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हातांना आणि मराठी माणसाला बळ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केली. डॉ. कोल्हे यांच्याबरोबर बदनापूरचे माजी आमदार अरविंद चव्हाण, किशोर पाटील, नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे यश पाटील, महाराष्ट्र भाजपच्या डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष हर्षल पवार यांनीही राष्ट्रवादी काँगेसमध्ये प्रवेश केला.

विधायक वाटेची जाणीव राष्ट्रवादीलाच

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत डॉ. अमोल कोल्हे आणि अन्य मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अनेकांना आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का प्रवेश करतोय असा प्रश्न पडला होता. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी तसंच मराठी माणसाला बळ देण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचं स्पष्टीकरण डॉ. कोल्हे यांनी यावेळी दिलं.  

ज्यांची छबी पाहण्यासाठी आपण लहानपणी पळत होतो आज त्यांच्याच पक्षात प्रवेश करताना आनंद होत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. तसंच तरूणांना विधायक वाटेची गरज असून त्याची जाणीव केवळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. देशपातळीवरील बदलत्या दिशेत आपला खारीचा वाटा असावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं कोल्हे यांनी स्पष्ट केलं.

शिरूरमधून लढणार ?

डॉ. अमोल कोल्हे हे शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिरूर मतदारसंघ शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खा. शिवाजीराव अढळराव पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे कोल्हे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघाचं तिकीट मिळाल्यास अढळराव पाटील यांना जोरदार टक्कर मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हेही वाचा -

मेट्रोमध्ये खाद्यपदार्थांना ‘नो एन्ट्री’

बेस्ट बसमध्येही होणार पुढील थांब्याची घोषणा


पुढील बातमी
इतर बातम्या