धर्मा पाटील मृत्यू प्रकरण: ३० दिवसांच्या आत व्याजासहित देणार मोबदला- बावनकुळे

शेतजमिनीचा योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या निधनानंतर खडबडून जाग आलेल्या सरकारने आता पाटील कुटुंबीयांना योग्य मोबदला देण्याचं आश्वासन दिलं आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरात तातडीने पत्रकार परिषद घेऊन पाटील कुटुंबीयांना नियमानुसार ३० दिवसांच्या आत व्याजासहित मोबदला देण्याचं आश्वासन दिलं आहे.

दिलं लेखी आश्वासन

ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांच्यासोबत फोनवर चर्चा देखील झाली. मात्र लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आपण धर्मा पाटील यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, यावर नरेंद्र पाटील ठाम होते. अखेर मंत्रालयातून बावनकुळे यांच्या विभागाकडून मोबदल्याप्रकरणी चौकशी करण्याचं आणि योग्य मोबदला देण्याचं पत्रक जारी केलं आहे.

कुटुंबीयांसमोर जमिनीचं पुनर्मूल्यांकन

नरेंद्र पाटील यांनी शेजारच्या शेतकऱ्यांना जास्त व आपल्याला कमी मोबदला दिल्याचा आरोप सरकारवर केला आहे. त्यामुळे पाटील कुटुंबीयांना योग्य तो मोबदला मिळावा म्हणून त्यांच्या शेतीमधील फळझाडांचं आणि शेती क्षेत्रफळाचं पुनर्मूल्यांकन नरेंद्र पाटील व त्यांच्या कुटुंबीयांसमोर करण्यात येणार आहे. त्यानुसार जो काही मोबदला असेल तो त्यांना व्याजासाहित नियमानुसार ३० दिवसांच्या आत देण्यात येईल, असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा-

धर्मा पाटील मृत्यू प्रकरण : मुख्यमंत्र्यांना लाज वाटायला हवी - सुप्रिया सुळे

मरणानंतर धर्मा पाटील यांचं नेत्रदान, एका नेत्रहीनाला मिळाली दृष्टी


पुढील बातमी
इतर बातम्या