सचिन तेंडुलकरची सुरक्षा घटवली

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत आता घट करण्यात आली आहे. सचिनला याआधी एक्स सुरक्षा देण्यात आली होती. ती आता कमी करण्यात आली आहे. त्यामुळे सचिनसोबत यापुढे २४ तास पोलीस कर्मचारी राहणार नसून एस्कॉर्ट सर्व्हीस पुरविण्यात येणार आहे. 

शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. आदित्य यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांना यापूर्वी  वाय प्लस सुरक्षा होती. महाराष्ट्रात ९७ व्हीआयपीना सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येते. यापैकी २९ व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक लोकांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची सुरक्षा घटवण्यात आली आहे. 

याशिवाय धोका लक्षात घेत १६ लोकांना सुरक्षा देण्यात आली आहे.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सुरक्षाही वाय प्लसवरून झेड करण्यात आली आहे.  तर भाजपनेते एकनाथ खडसे यांच्या वाय सुरक्षेतील एस्कॉर्टला हटविण्यात आलं आहे. 


हेही वाचा  -

धनंजय मुंडे यांना मंत्रीपद नाही? 'हे' आहे कारण

सेक्स रॅकेटसाठी व्हॉट्सअॅप, टिकटॉकचा वापर


पुढील बातमी
इतर बातम्या