गणेशोत्सव कार्यक्रमात काँग्रेस नेत्यावर उधळल्या नोटा

काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर एका गणेशोत्सव मंडपात नोटा उधळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला नि राजकीय वर्तुळात पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना चालना मिळाली. भाजपा आणि शिवसेनेकडून खान यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर हा प्रकार संबंधित गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केल्याने या कार्यकर्त्यांशी माझं काही देणंघेणं नाही, म्हणत हात वर केले आहेत.

काय प्रकार आहे?

आ. खान सोमवारी घाटकोपर पश्चिमेकडील हिमालय गणेश मंडळाच्या गणपती दर्शनाला गेले होते. तेव्हा तेथील कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर नोटा उडवल्या. अंगावर नोटा पडत असताना नसीम खान या कार्यकर्त्याना थांबवण्याऐवजी नोटांच्या पावसात हसत उभे राहिलेले व्हिडिओत दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्यांच्यावर टीका होऊ लागली.

काँग्रेस विसर्जित करण्याचं काम

यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर म्हणाले की, खान यांच्यावर पैसे उडवण्यात येणारा हा व्हिडिओ बघून काँग्रेस नेत्यांचं वर्तन कुठल्या थराला गेलं आहे हे कळत आहे. म. गांधी यांनी सांगितल्यानुसार हे नेते स्वत: हूनच काँग्रेस विसर्जित करण्याचं काम करताहेत असं वाटतंय.

मुख्यमंत्र्यांना पत्र

विशेष म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल होण्याआधी खान यांनी पेट्रोल-डिझेलमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत असल्याची चिंता व्यक्त करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं.

मी गणेशोत्सवाच्या निमित्ताने भानुशाली समाजाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथं पैसे उधळून प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्याची प्रथा आहे. प्रथेनुसार उडवण्यात आलेले पैसे नंतर गुजरातमधील गोशाळेला दिले जातात. ही त्यांची प्रथा असल्याने त्यात मी कुठलाही हस्तक्षेप केला नाही किंवा समर्थनही दिलं नाही. सार्वजनिक जीवनात काम करताना कुठल्याही नेत्याला सर्व धर्मियांच्या सण-उत्सवात सहभागी व्हावं लागतं. तेव्हा प्रत्येकाच्या प्रथा-परंपरांना मान द्यावाच लागतो.

- आ. नसीम खान, काँग्रेस,


हेही वाचा-

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष निरूपम की देवरा? निर्णय घेणार राहुल गांधी!

'राम कदम नरमले, महिलांचा सन्मान करू म्हणाले...'


पुढील बातमी
इतर बातम्या