ठाण्यात मनसेचा फेरीवाल्यांना पुन्हा चोप!

ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना शुक्रवारी सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा चोपलं असून त्यांना रेल्वे स्थानक परिसरातून हुसकावून लावलं आहे. रेल्वे स्थानकाच्या १५० मी. अंतराच्या आत बसणारे तसंच रेल्वे स्थानकातील शौचालयांचा गोदामासारखा वापर करणाऱ्या फेरीवाल्यांचा पर्दाफाश केल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्ते आणि मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

पुन्हा फेरीवाल्यांचा विरोध का?

एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न एेरणीवर आला. तर हा मुद्दा मनसेनं उचलून धरत त्याविरोधात आंदोलन केलं. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं फेरीवाल्यांसंदर्भातील याचिकेच्या सुनावणी दरम्यान रेल्वे स्थानकाच्या १५० मी. अतंरापर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई केली. तर त्याविरोधात कारवाईचे आदेशही महापालिकेला दिले.

प्रवाशांची तक्रार

असं असताना ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर मोठ्या संख्येनं अनधिकृत फेरीवाले बसत होते. या फेरीवाल्यांचा मोठा त्रास प्रवाशांना होत होता. या प्रवाशांच्या तक्रारीनुसार शुक्रवारी अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात खळखट्याक केल्याचंही जाधव यांनी सांगितलं आहे.

शौचालयाला बनवलं गोदाम?

जाधव यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी सायंकाळी रेल्वे स्थानक परिसरात धाव घेत फेरीवाल्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या या खळखट्याकमधून एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे या फेरीवाल्यांना रेल्वे स्थानकातील शौचालयांना गोदाम बनवलं होतं.

काय काय लपवलं?

या शौचालयात कपडे, मोबाइल कव्हर, बॅग हे सामान होतंच; पण त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे फळंही शौचालयात ठेवली होती. अनधिकृत फेरीवाल्यांना उठवायला महापालिका वा पोलिस आले की हे फेरीवाले सामान उचलून थेट या शौचालयात सामान लपवून ठेवतात हे समोर आल्याचंही जाधव यांनी सांगितलं. यापुढंही अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरूच राहीलं, पुन्हा फेरीवाले इथं आले, तर त्यांना दणके देऊ, असंही जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.


हेही वाचा-

फेरीवाल्यांना पुरावे सादर करण्याची नोटीस

टाऊन व्हेंडिंग कमिटीला सदस्यच मिळेना!


पुढील बातमी
इतर बातम्या