Silver oak attack: "गुप्तचर विभागानं कळवूनही पोलिसांनी हवा तेवढा बंदोबस्त ठेवला नाही"

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या गोंधळानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “गुप्तचर विभागानं कळवूनही पोलिसांनी हवा तेवढा बंदोबस्त ठेवला नाही.”

“याबाबत रीतसर चौकशी सुरू आहे आणि या चौकशीत पोलिसांना जी काही माहिती मिळत आहे, ती माहिती पोलिस न्यायालयात सादर करत आहेत. त्यामुळे त्यासंदर्भात नक्की चौकशीचा भाग काय आहे, काय नाही? हे आता न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना, उघड करणे काही योग्य होणार नाही.” असं दिलीप वळेस पाटील म्हणाले आहेत.

तसंच, “ही गोष्ट खरी आहे की ४ एप्रिल रोजी गुप्तचर विभागानं पत्र लिहून कळवलं होतं, तरी देखील कमतरता राहिली. जेवढ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवायला हवा होता, तेवढा ठेवला गेला नाही. या संदर्भात चौकशी केली जातेय. संबंधित पोलीस आयुक्तांची बदली केली आहे, गावदेवीच्या पोलीस निरीक्षकास निलंबित केलेलं आहे. चौकशी सुरू आहे, आणखी चौकशीत जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई करू.” असंही यावेळी गृहमंत्री वळेस यांनी बोलून दाखवलं.

दरम्यान, गृह विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं द फ्री प्रेस जर्नलला सांगितले की, “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप आणि आझाद मैदानावरील त्यांचे आंदोलन पाहता, राज्य गुप्तचर विभागानं गेल्या तीन महिन्यांपासून सतर्कतेचा इशारा दिला होता. पवार यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची सूचना केली होती. त्यात विशेषत: झोन II चे DCP योगेश कुमार यांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होणारी कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी अशी सूचना केली होती. मात्र, पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नसल्याचं शुक्रवारच्या आंदोलनानंतर उघड झालं. चौकशी समिती या पैलूकडे लक्ष देईल.”

योगायोगानं, अधिकाऱ्यानं सांगितलं की, वाहतूक मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे इथल्या निवासस्थानाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते आणि गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले होते.

शनिवारी झालेल्या बैठकांत अधिकाऱ्यानं सांगितलं की, ''राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख झेड प्लस सुरक्षा कवच घेत असतानाही पवारांच्या निवासस्थानावर अशी त्वरीत कारवाई करण्यात आली नाही.


हेही वाचा

राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेसाठी वाहतुकीत बदल, 'हे' रस्ते टाळा

ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेत 'लाव रे तो व्हिडिओ' पुन्हा गाजणार

पुढील बातमी
इतर बातम्या